मऊगंज (मध्यप्रदेश) - हातापायानं अगदी धडधाकट असलेली माणसं जीवनात खचलेली, निराश झालेली आपण पाहिली असतील. मात्र, दिव्यांग असलेल्या या कृष्ण कुमारला बघा, त्याला दोन्ही हात नाहीत. पण हात नसले म्हणून काय झाले, पाय आहेत की, नशीब बदलायला. बारावीच्या परीक्षेत त्यानं ५०० पैकी ४१४ गुण मिळवून ना केवळ अपंगत्त्वालाच हरवलं तर यशाला गवसणी घालण्यात अपंगत्व आड येत नसल्याचे दाखवून दिले.
मऊगंजच्या उत्कृष्ट शाळेत पहिल्या १० गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कृष्ण कुमारनं आपलं नाव मिळवलंय. शाळेत जाण्यासाठी त्याला रोज १० किलोमीटर चालत जावं लागतं. एखाद्या हातानं लिहिणाऱ्याला लाजवेल असं पायात पेन पकडून तो अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहितो. लिखाण पाहून हात नसल्याच्या दुर्बलतेवर त्यानं कधीच विजय मिळवलाय असं वाटतं. दिव्यांग असूनही १२ वीत गुणवंतांच्या यादीत चमकल्यानं परिसरात त्याचं कौतुक होतंय.
हात असणाऱ्यांनाही आश्चर्य वाटावं
कृष्णकुमारला जन्मापासूनच दोन्ही हात नाहीत. आपल्या तीन भावंडांसोबत लहानाचं मोठं होत असताना त्यानं पायानंच सर्व कामं करण्याची कला आत्मसात केलीय. दृढनिश्चय आणि एकाग्रतेनं त्यानं जे करून दाखवलं ते पाहून हात असणाऱ्यांनाही आश्चर्य वाटावं. दिव्यांग असल्यानं याचं कसं होणार, या काळजीत असलेल्या घरच्यांना आता त्याचा अभिमान वाटतोय. मोठं होऊन जिल्हाधिकारी होण्याचं कृष्णकुमारचं स्वप्नं आहे, जेणेकरून घरच्यांना आर्थिक हातभार लागेल.
मला जिल्हाधिकारी व्हायचे आहे, परंतु माझ्या वडिलांची मला पुढे शिकवण्याची क्षमता नाही, माझे वडील मला पुढे शिकवण्यासाठी काही करू शकत नाहीत, मला सरकारकडून काही पैशांची मदत मिळाली तर चागलं होईल. आत्तापर्यंत कुणाकडून कसलीही मदत मिळालेली नाही, असे कृष्ण कुमार म्हणाला. कृष्ण कुमारच्या या कामगिरीवर त्याची शिक्षक मंडळी जाम खूश आहेत. कृष्ण कुमार हा आमचा विद्यार्थी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे त्याचे शिक्षक आनंदानं सांगतात.