बंगळुरू – कर्नाटकमध्ये तहसीलदाराविरोधात पोलिसाने चक्क धरणे आंदोलन केल्याची घटना समोर आली आहे. तहसीलदाराच्या आदेशाने अनधिकृतपणे लावलेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या कारच्या टायरची हवा काढण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलने महात्मा गांधींचे छायाचित्र हातात घेवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 75 वर धरणे आंदोलन केले. दयानंद असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.
पोलीस कॉन्स्टेबल दयानंद यांनी अनधिकृतपणे कार ही सकलेशपूरमधील अपोलो औषधी दुकानाजवळ उभी केली. तहसिलदार मंजूनाथ हे जवळून जात असताना त्यांना चारचाकी चुकीच्या पद्धतीने लावल्याचे आढळले. त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल दयानंद यांच्याशी न बोलता थेट वाहन चालकाला चारही टायरमधील हवा काढण्याचे आदेश दिले. जेव्हा दयानंद हे दुकानामधून बाहेर आले, तेव्हा त्यांना चारही टायरमधील हवा काढल्याचे दिसून आले.