नवी दिल्ली - भाजप नेता कपिल मिश्रा यांना 'Y प्लस ' श्रेणीची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांना सुरक्षा पुरवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भडकाऊ भाषण दिल्याचा आरोप कपिल मिश्रा यांच्यावर आहे.
कपिल मिश्रा यांच्यासह अन्य भाजप नेत्यांच्य प्रक्षोभक भाषणांमुळे दिल्लीत हिंसाचार पसरल्याचा आरोप होत आहे. दिल्ली उच्च न्यायालयानेही प्रक्षोभक भाषण देणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी दिल्ली पोलिसांना निर्देश दिले आहेत. न्यायालयाने यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. दिल्लीत कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यास प्राधान्य असून भडकाऊ भाषणासंबधी तपास करण्यास पोलिसांनी वेळ मागून घेतला आहे.
दरम्यान, दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारनंतर आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत सुरक्षा प्रदान करण्याची मागणी कपील मिश्रा यांनी केली होती. त्यानुसार त्यांना Y प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. कपिल मिश्रा यांच्यासह अनुराग ठाकूर, परवेश वर्मा, अभय वर्मा यांच्यावरही भडकाऊ भाषण दिल्याचा आरोप आहे. भडकाऊ भाषणांमुळे दोन गटांत हिंसाचार पसरल्याचा आरोप भाजप नेत्यांवर आहे.
मौजपूर चौक येथे आंदोलनादरम्यान कपिल मिश्रा यांनी वादग्रस्त भाषण केले होते. डोनाल्ड ट्रम्प भारतातून जाण्याआधी पोलिसांनी शाहीन बाग आंदोलकांना हटवले नाही, तर आम्ही आमच्या पद्धतीने रस्ता खुला करू, असे मिश्रा म्हणाले होते. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांनी भडकाऊ भाषण देणाऱ्या नेत्यांवर गुन्हे कधी दाखल करणार असा सवाल पोलिसांना केला होता, मात्र, दुसऱयाच दिवशी मुरलीधर यांची पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात बदली झाली होती.