मुंबई - महाराष्ट्रावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत सध्या वादात सापडली आहे. मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली हील भागातील 'मणिकर्णिका' कार्यालयावर कारवाई केल्यानंतर तिने ट्विटचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कंगना ट्विटररद्वारे टीका करत आहे. आज तिने मराठीमधून टि्वट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
काय आहे कंगनाचे ट्विट ?
'मला अनेक मीम्स मिळाले आहेत. हे मीम माझ्या मित्राने पाठवले आहे. लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन, जय हिंद, जय महाराष्ट्र , असे टि्वट कंगनाने केले आहे.
सोबत तिने एक फोटो जोडला आहे. या फोटोत शिवाजी महाराज राणी लक्ष्मीबाईच्या वेशातील कंगनाला तलवार देत आहेत. तर उद्धव ठाकरे यांना रावणाच्या रुपात दाखविले आहे. तसेच रावण दहन दाखविले आहे. कंगनाने याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती.
'उद्धव ठाकरे आज फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडलं आहे. हे वेळेच चक्र असून उद्या तुमचं गर्वहरण होईल, हे लक्षात ठेवा. माझे घर पाडून तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत. आज मला काश्मिरी पंडितांना काय वाटलं असले, हे कळत आहे. मी फक्त अयोध्यावरच नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार आहे. देशवासियांना जागरूक करणार आहे. माझ्यासोबत झालेल्या या क्रुरतेचा आणि दहशतवादाचा काही अर्थ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र' असे कंगनाने व्हिडिओमध्ये म्हटलं होते.
अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. कंगना मुंबईत आल्यावर शिवसेनेच्या रणरागिणी तिला सोडणार नाहीत, असे वक्तव्य शिवसेना नेत्यांनी केले होते. मुंबईतील कंगनाच्या मणिकर्णिका कार्यालयाचे बांधकाम अवैध असल्याचे म्हणत महानगरपालिकेने कारवाई केली. यात कार्यालय जेसीबीने तोडण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईच्या विरोधात कंगनाच्या वकिलाकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आहे.