गोरखपूर (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे 1923ला गीता प्रेसची स्थापना झाली. गेल्या 92 वर्षांत या प्रेसने कल्याण पत्रिकेचे 1 हजार 102 अंक प्रकाशित करत आपल्या नावे आगळावेगळा विक्रम नोंदविला आहे. या पत्रिकेचे वैशिष्ट्य म्हणजे, तिच्या मुखपृष्ठावर असणारी देवी-देवतांची दुर्मीळ चित्रं. यामुळे, कल्याण पत्रिकेला वेगळी ओळख प्राप्त झाली आहे.
गीता प्रेसची प्रसिद्ध कल्याण पत्रिका गीता प्रेसची सुरुवात १९२६मध्ये जयदयाल गोयंका आणि हनुमान प्रसाद पोद्दार यांनी केली. तर, आज विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राधेश्याम खेमका हे कल्याण पत्रिकेचे संपादक तर, ट्रस्टी देवीदयाल अग्रवाल हे प्रकाशक आहेत.
मुंबईच्या वेंकटेश्वर प्रेसद्वारे या पत्रिकेचे प्रथम प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर गेल्या ९२ वर्षांपासून गोरखपूरच्या गीता प्रेसमधून निरंतर प्रकाशन सुरू आहे. कल्याणचे प्रकाशन सुरू झाले, तेव्हा ब्रिटिश राजवट होती. म्हणून सुरुवातीला या पत्रिकेला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला होता. 1940 च्या दशकात स्वातंत्र्याची मागणी जसजशी जोर धरू लागली, तसतसं कल्याण पत्रिकेवर हिंदू महासभेची भाषा बोलत असल्याचे आरोप करण्यात आले. मात्र, तेव्हाही पत्रिकेने आपले काम सुरुच ठेवले. आज दर महिन्याला जवळपास दोन लाख पत्रिका देशाच्या कानाकोपऱ्यात पोस्टाच्या माध्यमातून पाठवल्या जात आहेत.
ही पत्रिका आजही लोकांमध्ये धर्माचं महत्त्व पटवून देण्याचे कार्य करत आहे. या निरंतर कार्यामुळेच गोरखपूरच्या गीता प्रेसची यशोगाथा केवळ देशातच नव्हे तर, परदेशातही चर्चेचा विषय बनली आहे.