लडाख -भारत-चीन सीमावाद मागील तीन ते चार महिन्यांपासून चिघळलेला असून अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीनंतर तणाव आणखी वाढला आहे. त्यातच चीनने ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशा परिस्थितीतही लष्करी स्तरावर चर्चा सुरू आहे. मागील पाच दिवसांपासून लडाखमधील चुशुल सेक्टरमध्ये दोन्ही लष्कराच्या ब्रिगेड स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
२९/३० ऑगस्टच्या रात्री चीनने पँगाँग सरोवराच्या भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने चीनचा हा प्रयत्न उधळून लावला. सीमा वादावर चर्चा सुरू असताना चीनने जबाबदारपणे वागावे, असा इशारा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नुकताच चीनला दिला आहे. तर दुसरीकडे भारतानेच चीनच्या भुमीत घुसखोरी केल्याचा आरोप चीनने केला आहे.