नवी दिल्ली - मे महिन्यापासून पूर्व लडाखमधील भारत-चीन नियंत्रण रेषेवरील स्थिती तणावपूर्ण बनली आहे. चीनने आक्रमक धोरण स्वीकारत भारतीय भूमीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राजनैतिक, लष्करी आणि विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चांतून तोडगा न निघाल्याने सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी सीमेवरील महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. लडाख हा भूप्रदेश समुद्र सपाटीपासून १४ हजार ५०० फुटांनी उंच असल्याने हिवाळ्यात येथील परिस्थिती बिकट बनते. मात्र, चीनचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असून सीमेवर T-90, T-72 रणगाडे तैनात केले आहेत.
लडाख ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे. डोंगराळ भाग असल्याने येथे सैन्याच्या हालचाली करणे कठीण आहे. चीन बरोबरचा वाद हिवाळ्यापर्यंत वाढणार असल्याची शक्यता धरून भारतीय लष्कराने आधीपासूनच तयारी सुरू केली होती. सीमेवर भारतीय लष्कराने शस्त्रात्रे तैनात केली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
हिवाळ्यात लडाखमधील तापमान उणे ४० अंशापर्यंत जाते. अशा परिस्थितीत चिनी लष्कराचा सामना करणे हे लष्करासाठी एक आव्हान आहे. त्यामुळे हिवाळा सुरू होण्याआधी लष्कराने तयारी सुरू आहे. तीव्र तापमानात जवानांना राहण्यासाठीची व्यवस्था लष्कराकडून सुरू आहे.
पूर्व लडाखमधील चुमार देमचोक भागात भेट दिल्यास निदर्शनास येईल की, भारतीय लष्कर चीनचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. लष्करी वाहने, टी-९०, टी-७२ रणगाडे आणि बीएमपी-२ कॉम्बॅट व्हेईकल सीमेवर तैनात असून उणे ४० डीग्री सेल्सीअसमध्येही ती शत्रुवर हल्ला करू शकतात. चीनचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज झाले आहे. हिवाळ्यात रात्रीच्या वेळी तापमाणात मोठ्या प्रमाणात घट होते. अशा परिस्थितीत लष्कराच्या हालचाली, शस्त्रात्रे, लष्कराची राहण्याची व्यवस्था आणि इतर गरजेच्या वस्तुंची तयारी आधीपासूनच करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. बर्फाळ नद्या ओलांडण्यासाठी आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी जवानांना विशेष कपडे आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आली आहे.
चीनकडूनही सीमेवर हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे. मात्र, भारताने मागील काही दिवसांत मोक्याच्या ठिकाणांवर ताबा मिळवल्याने चीनच्या हालचालींवर दुरून लक्ष ठेवता येत आहे. तीव्र थंडीत लष्करी वाहने, तोफा आणि इतर यंत्रसामुग्रीची देखभाल घेणं एक मोठं आव्हान असते. मात्र, त्याची पुरेशी व्यवस्था भारतीय लष्कराने आधीपासूनच करून ठेवली आहे.