नवी दिल्ली-कोरोना व्हायरस संकटामुळे भारतात सर्वात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच अशी परिस्थीती उद्भवली असल्याचे आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. त्यांनी सोशल मिाडियावर पोस्ट लिहून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या प्रभाव आणि परिणामांवर भाष्य केले आहे.
जागतिक आर्थिक मंदीचा 2008-09 मधे भारतावर बऱ्याच प्रमाणात परिणाम झाला होता. तरीही आर्थिक व्यवहार सुरु होते. कारण, त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात सुदृढ होती. मात्र, त्यावेळी प्रमाणे कोणत्याही मूलभूत गोष्टी सध्या सकारात्मक दिसत नसल्याचेही राजन यांनी नमूद केले.
आर्थिकदृष्ट्या सांगायचे तर, स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आत्तापर्यंत भारत सर्वात मोठ्या आपात्कालीन परिस्थितीशी सामना करत आहे. 2008-०9 मधील जागतिक आर्थिक संकटाचा देशाला मोठा फटका बसला होता. परंतू, तो सहन करण्याएवढी क्षमता होती. कारण, कामगार कामावर जाऊ शकत होते. लहान मोठे उद्योग सुरू होते आणि त्यांना हळूहळू उभारी येत होती. एकुणच तेव्हा अर्थव्यवस्था निरोगी होती. मात्र आता, परिस्थिती भिन्न आहे. आज कोरोना व्हायरस या साथीच्या रोगाविरूध्द देश लढत आहेत. लॉकडावूनमुळे व्यवहार ठप्प आहेत. कामगार कामावर जाऊ शकत नाही आहेत. त्यामुळे भयंकर परिस्थिती उद्भवणार असून हे देशासमोरील सर्वात मोठे संकट ठरणार आहे, असे राजन यांनी लिंक्डइनवर लिहीलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
यावर मात करण्यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाय योजना करणे, हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी रूग्ण किंवा संशयितांच्या व्यापक प्रमाणात चाचण्या घेत त्वरित निदान होणे गरजेचे आहे. तसेच, क्वारंटाईन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे राजन यांनी सांगितले आहे,