नवी दिल्ली - सध्या भारत-चीन सिमेवर तणावाचे वातावरण असून येत्या 12 ऑक्टोबरला दोन्ही देशादरम्यान कंमाडर स्तरीय चर्चा होणार असल्याची माहिती आहे. आतापर्यंत भारत आणि चीन लष्कर कॉर्प्स कमांडर स्तरावर 6 बैठका झाल्या आहेत. या बैठकातून सिमेवर शांतता प्रस्थापीत करण्यावर एकमत झाले. मात्र, त्या दृष्टीने चीनने कोणतेही पाऊल उचलेले नाही.
6 जून, 22 जून, 30 जून, 14 जुलै, 2 ऑगस्ट आणि 21 सप्टेंबरला कोर कमांडर स्तरावर बैठका झाल्या होत्या. मात्र, या बैठकांचा काहीच परिणाम झालेला नाही. चीनचे 1959 मध्ये तत्कालीन पंतप्रधान चाउ एन लाई यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहले होते. या पत्राचा हवाला देत, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने वाद सोडवण्याची मागणी केली आहे. मंगळवारी चीनच्या प्रवक्त्यांनी 1959 च्या प्रस्तावाला प्राधान्य दिले आहे. लडाख भारताचा केंद्रशासित प्रदेश म्हणून चीन मानत नाही. तसेच लडाखमध्ये भारताची लष्करी पायाभूत सुविधा उभारण्यास चीनने आक्षेप घेतला आहे. चीनच्या या भूमिकेमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
वास्तविक नियंत्रण रेषेजवळ जवळजवळ दोन्ही देशाचे सैनिक तैनात आहेत. हा संघर्ष सोडविण्यासाठी चर्चेव्यतिरिक्त संबंधित संरक्षण मंत्री, परराष्ट्रमंत्री आणि विशेष प्रतिनिधी यांच्यात बैठकींच्या फेऱ्या होत आहेत. 21 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे प्रतिनिधित्व लेफ्टनंट जनरलर हरेंदर सिंग यांनी केले होते. यात परिस्थिती आहे, तशी ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी होकार दर्शवला होता.
तथापि, सीमेवर असलेल्या तणाव परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जवानांची गस्त वाढवण्यात आली आहे. फिंगर फोर परिसरात आठ सप्टेंबरला दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर 17 स्पटेंबरला सैनिकांचे लक्ष विचलीत करण्याच्या दृष्टीने चीनी सैन्याने फिंगर फोर भागामध्ये लाऊडस्पीकरवरुन पंजाबी गाणी मोठ्याने वाजवली होती. तसेच चीनी सैन्याने भारतीय सैनिकांना उकसवण्यासाठी जाणीवपूर्वक हवेत गोळीबार केल्याचे लष्कराने स्पष्ट केले होते. अशाच प्रकारच्या आणखी दोन घटना 29 ते 31 ऑगस्टलाही झाल्या होत्या. सिमेवरील तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशादरम्यान चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत. मात्र, चीनच्या आडमुठेपणामुळे परिस्थीती आणखी बिघडत चालली आहे.