भूवनेश्वर -कोरोना काळात भारताची अर्थव्यवस्था रसातळाला पोहचली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा विकास दर उणे २३.९ टक्के झाला आहे. मात्र, भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी सरकारची पाठराखण केली आहे. कोरोना काळात सरकारने टाळेबंदी करून भारतीय जनतेचे फक्त जीव वाचविले नाही, तर अर्थव्यवस्थेचीही काळजी घेतली. सरकारने उचललेल्या पावलांमुळे एका संकटाचे संधीत रुपांतर झाले, असे नड्डा म्हणाले.
ओडिशातील पक्षाच्या कार्यकारणीत त्यांनी हे वक्तव्य केले. 'शक्तीशाली देश जेव्हा कोरोनाचा सामना करताना असहाय्य झाले होते. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार स्पष्ट होते. लोकांचे जीव वाचविण्यासाठी त्यांनी धाडसी निर्णय घेतले. १३० कोटी जनतेचे जीव वाचविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मोदींनी स्पष्ट केले होते. 'जान है तो जहाँ है' असे मोदींनी म्हटले होते. तेव्हा सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवणे हा मुद्दा मोदींपुढे होता', असे नड्डा म्हणाले.