पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. मिरामार समुद्र किनारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिजात आणि उत्पल या दोन मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी 'हमारा नेता कैसा हो, मनोहर भाई जैसा हो', 'जब तक सुरज चांद रहेगा मनोहर भाई तेरा नाम रहेगा' अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
मनोहर पर्रिकर पंचत्वात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गेल्या काही काळापासून स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत होते. अमेरिकेतही अनेकदा त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. गेल्या महिन्यापासून पर्रीकर अत्यवस्थ होते. अखेर रविवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी पर्रीकरांचे पार्थिव भाजपच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी कला अकादमीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, नितीन गडकरी, स्मृती इराणी यांनी अंत्यदर्शन घेतले. यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास पर्रीकरांची अंत्ययात्रा निघाली. मिरामार येथील समुद्रकिनाऱ्यावरील मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराकडून त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.