नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी गुरुवारी सकाळी दिल्लीमध्ये फिट इंडिया मूव्हमेंट या अभियानाचा प्रारंभ केला. यावेळी बोलताना त्यांनी निरोगी जीवनाचे महत्त्व पटवून दिले. धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोक आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे फिट इंडिया अभियान एक जनआंदोलन बनण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले.
आपल्या देशाला मेजर ध्यानचंद सारखे खेळाडू मिळाले. आज जग त्यांना नावाजत आहे. या अभियानाद्वारे देशामध्ये फिट होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात येत आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये पुढे जाणयासाठी निरोगी असणे गरजेचे आहे. देशाची जनता या अभियानाला पुढे घेऊन जाईल. यामध्ये 'झिरो इनव्हेस्टमेंट' आहे, हे अभियान फक्त सरकारचे नसून देशातील सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपले युवा खेळाडू जगामध्ये भारताचे नाव उंचावत आहेत. त्यांच्यापासूनही लोकांना प्रेरणा मिळेल. फिटनेस अभियान यशस्वी राबवण्यासाठी सर्व राज्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तुम्ही स्वत: फिट असाल तर देश तंदुरुस्त असेल. देशातील नागरिक आरोग्यवान असतील तर देश पुढे जाईल असे मोदी म्हणाले. राज्य, शाळा विद्यालये, स्थानिक प्रशासन, खासगी आस्थापने, कुटुंब सगळीकडे आरोग्याबाबत जनजागृती होण्याची गरज मोदींनी व्यक्त केली.