नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा सदनाच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने मंगळवारी सदनाकडून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी गुलाम नबी आझाद यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे चित्र बघायला मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले शरद पवारांची कौतुक सुमने
गुलाब नबी आझादांनी काँग्रेसचा विचार स्वीकारत युवक काँग्रेसचे काम पाहिले. संघटन कौशल्याचा वापर देशहितासाठी केला असे कौतुक शरद पवार यांनी केले. नव्या पिढीला संघटीत करण्याचे काम त्यांनी केले. १९८२ मध्ये वाशीममधून ते लोकसभेची निवडणूक लढले. यावेळी आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार केला. मात्र ते निवडून आले. यानंतर मात्र त्यांनी वाशीममधल्या लोकांचा विश्वास संपादन करत तिथल्या विकासाकडे विशेष लक्ष दिले. याशिवाय विदर्भाच्या विकासाकडेही त्यांनी लक्ष दिले. त्यामुळे ते तिथून पुन्हा निवडून आले. यामुळेच आजही वाशीमची जनता त्यांची आठवण काढते असे कौतुक पवार यांनी केले.
राजकीय मतभेद असूनही सलोखा जपण्याचे कौशल्य
राजकीय मतभेद असूनही वैयक्तिक सलोखा जपण्याचे कौशल्य गुलाम नबी आझाद यांच्याकडे आहे. विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत असे पवार यावेळी म्हणाले.