भुवनेश्वर - भारतातील ओडिशातील अर्चना सोरेंग या 24 वर्षीय हवामान कार्यकर्तीला संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी त्यांच्या नवीन सल्लागार गटात समाविष्ट केले आहे. या गटात जगभरातील सहा नेत्यांचा समावेश आहे. या सर्वांचे वय 18 ते 28 दरम्यान आहे. हे सर्वजण जागतिक स्तरावरील वाढत्या हवामान संकटावर उपाययोजनांसंदर्भात यूएन प्रमुखांना सल्ला देतील.
यामध्ये समावेश झालेल्या सोरेंग यांचा संशोधन आणि वकिलीतील अनुभव आहे. तसेच, त्या मूळ भाषेतील पारंपारिक ज्ञान आणि सांस्कृतिक पद्धतींचे दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहेत, असे यूएनने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे. सोरेंग या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) मुंबईच्या विद्यार्थिनी असून त्या टीआयएसएस विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष आहेत. ‘आपल्या पूर्वजांनी त्यांचे पारंपारिक ज्ञान आणि पद्धतीद्वारे युगानुयुगे जंगल आणि निसर्गाचे संरक्षण केले आहे. आता हवामानातील संकटाचा सामना करण्यासाठी आपण त्यांच्याच मार्गाने सर्वोत्कृष्ट प्रयत्न करू शकतो,’ असे सोरेंग म्हणाल्या.