महाराष्ट्र

maharashtra

प्रदूषणामुळे दिल्लीतील विमानसेवा विस्कळीत; ३२ विमानांच्या मार्गात बदल

By

Published : Nov 3, 2019, 3:18 PM IST

धुक्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ३२ विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे देखील हाल होत आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये खराब हवामानामुळे जनजीनव विस्कळीत झाले आहे. त्यातच धुक्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ३२ विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. प्रदूषणामुळे हवा धुरकट बनली आहे. त्यामुळे विमान चालवण्यास अडचणी येत आहेत. विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

दिवाळी दरम्यान शहरामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली. त्याबरोबरच राजधानी क्षेत्रालगतच्या हरियाणा, उत्तर प्रदेश राज्यामध्ये शेतकरी पिकांचा टाकाऊ भाग पेटवून देत आहेत. त्यामुळे देखील प्रदूषणात भर पडली. शेतकऱ्यांनी शेतामध्ये आगी लावू नये म्हणून प्रशासनाने कडक कारवाई करण्यासंबधीचे आदेश दिले आहेत.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये हवेचा स्तर ६२५ निर्देशांकावर पोहोचला आहे. मात्र, हवेचा स्तर ९०० निर्देशांकापर्यंत पोहचला असल्याचे बोलले जात आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळेही प्रदूषण कमी झाले नाही. प्रदूषणाचा जोर कमी होण्यासाठी पुढील सोमवारपर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

लोकांना घराबाहेर पडता येईना

प्रदूषणामुळे नागरिकांना कामासाठी घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे. डोळ्यांमध्ये जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. त्यामुळे शहरामध्ये आरोग्य आणिबाणी आली आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सकाळी व्यायामासाठी तसेच दिवसभर नागरिक मास्क लावून बाहेर पडत आहेत. महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details