नवी दिल्ली- देशभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशात लोकांना रुग्णालयांपर्यंत पोहोचण्यासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिल्लीतील लोक पीसीआरकडे (पोलीस कंट्रोल रुम) मदत मागत आहेत. पोलिसही त्यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत करत आहेत. गेल्या ४८ तासांत पोलिसांनी गर्भवती महिलांसह ४० लोकांना रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली आहे.
डीसीपी शरत सिन्हा यांनी सांगितले, की दिल्लीत लॉकडाऊनमुळे अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास अडचणी येत आहेत. अनेक गर्भवती महिलांना प्रसूती वेदना सुरु झालेल्या असतानाही रुग्णवाहिका मिळत नाही. असे प्रकार जेव्हा पीसीआरला समजले तेव्हा तातडीने पीसीआर त्यांच्या मदतीसाठी पोहोचले. मागील ४८ तासात यामार्फत ३८ गर्भवती महिलांची मदत केली गेली आहे.