नवी दिल्ली - लोकनायक रुग्णालयात मरण पावलेल्या ५० वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाने उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. मोईजुद्दीन असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. मृत्यूच्या चार दिवसानंतरही मृतदेह रुग्णालयाने ताब्यात दिला नाही, असा आरोपही या कुटुंबाने केला आहे.
हृदयविकाराचा रुग्ण असलेल्या मोईजुद्दीनला रक्तदाब कमी झाल्यावर सुरुवातीला जेबी पंत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्याला लोकनायक रुग्णालयात रेफर करण्यात आले. लोकनायक येथे अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले की, रुग्णाची कोविड चाचणी करण्यात येईल. रुग्णालयातील कर्मचारी उपचारात उशीर करतच राहिले आणि माझा भाऊ मरण पावला, असे त्याचा भाऊ अजाजुद्दीन यांनी सांगितले आहे.