महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, 'सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणार'

आज काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी दिल्ली काँग्रेस अध्यक्ष सुभाष चोप्रा आणि इतर नेते उपस्थित होते.

By

Published : Feb 2, 2020, 1:50 PM IST

दिल्ली निवडणूक
दिल्ली निवडणूक

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी केली आहे. 'अशी असणार काँग्रेसची दिल्ली' या घोषवाक्यासह आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी दिल्ली काँग्रेस अध्यक्ष सुभाष चोप्रा आणि इतर नेते उपस्थित होते. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे तसेच सत्तेमध्ये आल्यानंतर 6 महिन्यांच्या आतमध्ये जनलोकपाल विधेयक आणण्याचे आश्वासन दिले आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून...
  • केजरीवाल हे जनलोकपाल विधेयक आणण्याचे आश्वासन देऊन सत्तेमध्ये आले. तसेच, काँग्रेसने आणलेले लोकपाल त्यांनी कमकुवत केले. त्यामुळे सत्तेमध्ये आल्यानंतर 6 महिन्यांच्या आतमध्ये योग्य असे जनलोकपाल विधेयक आणण्यात येईल.
  • बेरोजगार युवकांसाठी युवा स्वाभिमान योजना सुरू करण्यात येईल. त्या अंतर्गत पदवीधारक बेरोजगार तरुणांना 5 हजार तर पदव्युत्तर तर बेरोजगार असलेल्या तरुणांना 7 हजार 500 रुपये बेरोजगार भत्ता देण्यात येईल.
  • सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात येईल. तसेच मुलींना नर्सरी ते पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात येईल.
  • गेल्या 5 वर्षांमध्ये प्रदूषणामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यावर अर्थसंकल्पातली 25 टक्के हिस्सा प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी खर्च करू.
  • राज्यातील वृद्ध, विधवा, दिव्यांगांसाठी पेन्शन 2 हजार 500 वरून 5 हजार करण्यात येईल. ही योजना दिवगंत काँग्रेस नेत्या शीला दिक्षित यांच्या नावाने सुरू करण्यात येईल. कारण, ही योजना त्यांनी 200 रुपयांपासून सुरू केली होती.
  • काँग्रेस सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही 300 युनिटपर्यंत वीज मोफत देऊ. तर 300 ते 400 युनिटवर 50 टक्के आणि 400 ते 500 युनिटवर 30 टक्के आणि 500 ते 600 युनिटवर 25 टक्के सबसीडी देण्यात येईल.
  • दिल्लीमध्ये नवीन 10 हजार इलेक्ट्रिक बस आणण्यात येतील.
  • तरुणांना स्टार्टअप निधी देण्यात येईल. तसेच थ्री व्हीलर गाडी आणि ई-रिक्क्षा चालकांचे सर्व कर्ज माफ करण्यात येईल.

दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडेल. तर, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तत्काळ प्रभावी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा -दिल्ली निवडणूक : भाजपचे 'संकल्प पत्र'.. गरीबांना 2 रुपये प्रति किलो दराने मिळणार गव्हाचे पीठ

ABOUT THE AUTHOR

...view details