नवी दिल्ली- फेब्रुवारी महिन्यात उत्तर पूर्व दिल्लीत दंगे घडले होते. याप्रकरणी भारतातील फेसबुकचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांना दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सौहार्द समितीने नोटीस पाठवली आहे. त्यात मोहन यांना २३ सप्टेंबरला समिती समोर हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.
मोहन हे समितीच्या मागील बैठकीत उपस्थित नव्हते. त्यामुळे, समितीतर्फे यंदा बैठकीला उपस्थित राहण्याची ताकीद देण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष आम आदमी पक्षाचे आमदार राघव चड्डा आहेत. मोहन यांनी नोटीसची अवमानना केल्यास ते समितीला मिळालेल्या घटनात्मक हमी सुविधांचे उल्लंघन समजले जाईल, असे आज समितीने आपल्या निवेदनात सांगितले आहे.
मोहन यांनी समितीच्या बैठकीला बगल दिल्यास तो दिल्ली विधानसभा, तसेच राष्ट्रीय राजधानीतील जनतेचा अवमान असेल, असे चड्डा यांनी सांगितले. तसेच, ज्या प्रकारे फेसबुकने संसदेच्या स्थायी समितीला सहकार्य केले, त्याचप्रमाणे दिल्ली विधानसभेच्या कार्यवाहीला देखील त्यांनी योग्य प्रतिसाद द्यावा, असे आवाहन चड्डा यांनी केले.