नवी दिल्ली - सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात खासदार डीएमके पक्षाचे नेते दयानिधी मारन यांनी देशातील सद्यस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच 'आताच्या कॅबिनेटमधील एकाही मंत्र्यामध्ये 'मोदी तुम्ही चुकताय,' असं सांगण्याची हिंमत नाही, असे ते म्हणाले. मोदीच्या रात्री 8 वाजता येऊन घोषणा करण्याच्या सवयीने लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच, मोदींनी अचानक लॉकडाऊन लागू केले. मात्र, लॉकडाऊन काळात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजनाही सरकारने केल्या नाहीत, असे ते म्हणाले.
'पहिल्या कोरोना रुग्णांची नोंद 3 फेब्रुवारीलाझाली. तेव्हा आपण जागे व्हायला हवे होते. सीमा बंद करायला हव्या होत्या, चाचणी सुरू करायला हवी होती. मात्र, त्यावेळी मोदीजी नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात व्यस्त होते. जेव्हा कोरोनाचे संक्रमण पसरण्यास सुरुवात झाली, तेव्हा एका कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र आले. तसेच, कोरोनाचे संक्रमण रोखण्याची वेळ आली. तेव्हा मध्य प्रदेशमधील सरकार कोसळले आणि राजकीय घडामोडींना वेग आला. मोदींच्या निष्काळजीपणाच्या स्वभावामुळे कोरोनाचे भारतामध्ये संक्रमण पसरले, अशी टीका दयानिधी मारन यांनी केली.