चेन्नई - कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे तामिळनाडूने आपल्या सीमा बंद केल्या आहेत. केवळ अत्यावश्यक सेवांसाठी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
COVID-19 LIVE : केरळमध्ये दिवसभरात १२ नवे रुग्ण; देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २२३हून अधिक
19:49 March 20
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या सीमा बंद..
19:41 March 20
कोरोनाच्या भीतीने कानपूरमधील पूर्ण इमारत केली सील..
लखनऊ- कोरोनाच्या भीतीने कानपूरमधील कल्पना टॉवर ही रहिवासी इमारत सील करण्यात आली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या इमारतीमध्ये कनिकाचे मामा राहतात, त्यांच्या घरी १२ आणि १३ मार्चरोजी कनिका राहिली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
19:20 March 20
हिमाचलमध्ये दोन नवे रुग्ण..
शिमला -हिमाचल प्रदेशमध्येही कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत.
19:12 March 20
केरळमध्ये आढळले आणखी चार रुग्ण, राज्यातील रुग्णांची संख्या ४० वर..
तिरुवअनंतपुरम- केरळमध्ये आणखी चार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४० वर पोहोचली आहे. आज राज्यात एकूण १२ रुग्ण आढळून आले. यांपैकी एर्नाकुलममध्ये ५, कासारगोडमध्ये ६ तर पालाक्काडमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. एकूण ४० रुग्णांपैकी तीन रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
19:07 March 20
राजस्थानमध्ये आढळले कोरोनाचे आणखी सहा रुग्ण, तीन डॉक्टरांचाही समावेश..
जयपूर - राजस्थानच्या भीलवाडामध्ये कोरोनाचे आणखी सहा रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये तीन डॉक्टर आणि तीन कंपाऊंडर यांचा समावेश आहे. यानंतर भीलवाडा शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच, भीलवाडा जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत.
18:37 March 20
नवी दिल्ली -देशभरामध्ये कोरोनाचे २२० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
वाचा :कोरोना : पंतप्रधान मोदींनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद
18:30 March 20
केरळमध्ये आढळले पाच नवे रुग्ण, राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३३ वर..
तिरुवअनंतपुरम - केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यामध्ये कोरोनाचे आणखी पाच रुग्ण आढळले आहेत. हे पाचही परदेशी नागरिक असून, कोरोनाग्रस्त ब्रिटिश नागरिकासोबत हे प्रवास करत होते. या सर्वांना कलामसारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. यांच्यासह आणखी १३ प्रवाशांची तपासणी करण्यात आली होती, या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
18:30 March 20
लखनौ -देशामध्ये कोरोना बाधित रुग्णाची संख्या 220 पेक्षा अधिक झाली आहे. 'बेबी डॉल' या लोकप्रिय गाण्याची गायिका कनिका कपूरला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचा मुलगा दुष्यत सिंह कनिकाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे वसुंधरा राजे अन् त्यांचा मुलगा दुष्यत सिंह हे सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत.
वाचा :भाजप नेत्या वसुंधरा राजेंसह मुलगा दुष्यत सिंह सेल्फ आयसोलेशनमध्ये..
18:29 March 20
पुणे - कोरोना विषाणूशी लढा देण्यास राज्य सरकार सक्षम आहे. राज्याला केंद्राकडे निधी मागण्याची आवश्यकता नाही, असे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीनुसार काम करत काळजी घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. ते येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
वाचा :'कोरोनाशी लढा देण्यास राज्य सरकार सक्षम; राज्याकडे पुरेसा निधी'
17:41 March 20
जागतिक बॅडमिंटन संघटनेने पाच स्पर्धा केल्या रद्द..
नवी दिल्ली- जागतिक बॅडमिंटन संघटनेने आणखी पाच स्पर्धा रद्द केल्या आहेत. यामध्ये तीन कॉन्टिनेन्टल चॅम्पियनशिप्सचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
17:27 March 20
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २२३, चौघांचा बळी; आरोग्य मंत्रालयाची माहिती..
नवी दिल्ली -देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २२३ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत चार जणांचा यात मृत्यू झाला आहे. तर, १५हून अधिक रुग्ण बरेही झाले आहेत.
17:18 March 20
गुजरातमध्ये आढळला कोरोनाचा आणखी एक रुग्ण, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७वर..
गांधीनगर - गुजरातमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण इंग्लंडहून परतल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या सातवर पोहोचली आहे.
17:10 March 20
अवघ्या दोन तासांमध्ये समजणार कोरोनाचा अहवाल, मराठी संशोधकाचा शोध..
बिलीसी - जॉर्जियामधील ऑगस्टा विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोनाची तपासणी करण्यासाठी अधिक अचूक आणि वेगवान चाचणी तयार केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, या पथकातील सर्व संशोधक भारतीय वंशाचे आहेत. तसेच यांचे प्रमुख हे महाराष्ट्रातील डॉ. रविंद्र कोल्हे हे आहेत. या नव्या चाचणीद्वारे अवघ्या दोन तासांमध्येच कोरोनाबाबतचा अहवाल मिळू शकणार आहे.
16:59 March 20
देशात पूर्णपणे बंदी लागू होणार नाही, 'ती' ध्वनीफीत खोटी; 'पीआयबी'चे स्पष्टीकरण..
नवी दिल्ली- जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी आणि देशाच्या आरोग्य विभागातील अधिकारी यांदरम्यानच्या फोन कॉलची एक ध्वनीफीत सध्या सोशल मीडियामध्ये पसरत आहे. यामध्ये ते देशात पूर्णपणे बंदी लागू करण्याबाबत बोलत आहेत. मात्र, ही ध्वनीफीत खरी नसून, ती खोटी आहे आणि लोकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेऊ नये, असे स्पष्टीकरण माहिती प्रसारण कार्यालयाने (पीआयबी) दिले आहे.
16:38 March 20
जयपूरमधील व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे नाही, मृत्यूपूर्वीच उपचार झाले होते यशस्वी..
नवी दिल्ली -जयपूरमधील रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे नाही, तर हार्ट अॅटकने झाला होता. त्यापूर्वीच त्यावरील उपचार यशस्वी झाले होते. त्यामुळे, त्याला कोरोनाचा बळी म्हणता येणार नाही असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या बळींची संख्या चारच राहिली आहे. तसेच, आतापर्यंत देशात कोरोनाचे २०६ रुग्ण आढळले आहेत, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
16:30 March 20
दिल्ली विमानतळावरील आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द!
नवी दिल्ली- दिल्ली विमानतळावरील सर्व आंतरराष्ट्रीय विमाने रद्द करण्यात आली आहेत. २२ मार्च ते २९ मार्चपर्यंत या विमानतळावरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे.
16:28 March 20
देशात अडकलेल्या परदेशी नागरिकांच्या व्हिसामध्ये वाढ..
नवी दिल्ली- देशात अडकलेल्या, आणि आपल्या मायदेशी परत जाऊ न शकणाऱ्या परदेशी नागरिकांच्या व्हिसामध्ये वाढ होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालायने हा निर्णय घेतला आहे. या परदेशी नागरिकांच्या व्हिसा, आणि ई-व्हिसाची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
16:15 March 20
अफवांना बळी पडू नका, माहितीसाठी टोल फ्री नंबरवर फोन करा; आरोग्य मंत्रालयाचे आवाहन..
नवी दिल्ली- देशातील नागरिकांनी अफवांना बळी पडू नये. कोरोनासंबंधी कोणतीही माहिती हवी असल्यास, १०७५ या टोल फ्री नंबरवर फोन करावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी केले आहे.
15:42 March 20
'जनता कर्फ्यू'साठी २२ मार्चला दिल्ली मेट्रो राहणार बंद..
नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर, आता दिल्ली मेट्रोनेही यासंदर्भात निर्णय घेतला आहे. डीएमआरसीने २२ मार्चला आपली सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
15:20 March 20
लडाखमध्ये आढळले कोरोनाचे दोन नवे रुग्ण, प्रांतातील एकूण संख्या दहावर..
लडाख - लडाखमध्ये कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे प्रांतातील एकूण रुग्णांची संख्या दहावर पोहोचली आहे.
15:17 March 20
तेलंगाणामध्ये आढळले कोरोनाचे दोन नवे रुग्ण..
हैदराबाद - तेलंगाणा राज्यात कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. हे दोघेही लंडनहून परतल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. यानंतर राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १८ वर पोहोचली असून, आतापर्यंत एक रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे.
15:14 March 20
पश्चिम बंगालमध्ये मिळणार मोफत तांदूळ..
कोलकाता- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालच्या सार्वजनिक वितरण विभागाकडून पुढील सहा महिन्यांपर्यंत मोफत तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ही घोषणा केली. यासोबतच, राज्यातील सरकारी कर्मचारी हे आता आळीपाळीने काम करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, केंद्र सरकारला आपण आणखी वैद्यकीय सुविधा मागितल्याचेही त्यांनी सांगितले.
14:57 March 20
केरळमधील परीक्षा ढकलल्या पुढे..
तिरूवअनंतपुरम - केरळ सरकारने राज्यातील एसएसएलसी, बारावी आणि इतर परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तसेच, राज्यातील आठवी आणि नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री विजयन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, राज्यातील सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा याआधीच पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
14:51 March 20
रत्नागिरी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. पाच पेक्षा अधिकजण जेथे एकत्र येतात अशी ठिकाणे बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा म्हणजेच किराणा सामान (Grocery), दूध, भाजीपाला, फळे व औषधालये (Chemist Shop) यांना हा आदेश लागू नाही. दरम्यान, या अत्यावश्यक सेवा वगळता बाकी बाजारपेठ बंद आहेत.
14:50 March 20
मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ ली ते ८ वीच्या परीक्षा रद्द केल्या असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. ९ वी आणि ११ वीचे पेपर १५ एप्रिलनंतर घेतले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच १० वीचे शिक्षक सोडून इतर शिक्षकांनी घरुनच काम करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
वाचा :BREAKING : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ ली ते ८ वीच्या परीक्षा रद्द - वर्षा गायकवाड
14:49 March 20
मुंबई - राज्यातील महानगरांमधील सर्व दुकाने 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यासंबंधी त्यांनी ऑनलाईन पद्धतीद्वारे राज्याला संबोधित केले. बंद करण्यात आलेल्या शहरांमध्ये मुंबई महानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरचा समावेश आहे. फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
13:16 March 20
इराणमधील एक हजार भारतीयांना पुरवल्या गरजेच्या वस्तू, भारतीय दूतावासाची माहिती..
तेहरान - इराणमध्ये कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेल्या सुमारे एक हजार भारतीय मासेमारांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात आल्या आहेत. इराणमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली. तामिळनाडू, गुजरात आणि केरळमधील हे मासेमार आहेत. इराणमधील भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकार इराणच्या संपर्कात आहे.
13:00 March 20
दहाहून अधिक देशांसोबत चीन साधणार संवाद, संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी करणार मदत..
नवी दिल्ली- युऱेशिया आणि दक्षिण आशियामधील दहाहून अधिक देशांशी चीन संवाद साधणार आहे. कोरोना विषाणूबाबत खबरदारी आणि उपायांबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा पार पडणार आहे. यासोबतच, चीन आपल्या शेजारील मित्रराष्ट्रांना कोरोनाशी लढा देण्यात मदतही करणार आहे. भारतातील चीनचे राजदूत सुन वेईडाँग यांनी ही माहिती दिली.
12:51 March 20
कोलकातामध्ये आढळला नवा रुग्ण, लंडनहून आलेल्या २२ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण..
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. १३ मार्चला लंडनहून आलेल्या एका २२ वर्षीय तरुणाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. १६ मार्चपासून त्याला बेलेघाटा आयडी&बीजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या सर्व कुटुंबीयांना विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, यानंतर आता राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २ झाली आहे.
12:45 March 20
जयपूर - देशभरात कोरोना संसर्गामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. नुकतेच रास्थानातील जयपूरमध्ये एका परदेशी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दगावलेला व्यक्ती इटलीचा नागरिक असून राजस्थानात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. फोर्टिस रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.
वाचा :इटलीच्या कोरोनाग्रस्ताचा जयपुरात मृत्यू; देशभरात ५ जण दगावले
12:31 March 20
उत्तर प्रदेशमध्ये चार नवे रुग्ण, राज्यातील रुग्णांची संख्या २३ वर..
लखनऊ- उत्तर प्रदेशच्या राजधानीमध्ये कोरोनाचे आणखी चार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे.
12:27 March 20
गुजरातमधील रुग्णांची प्रकृती स्थिर, मुख्य आरोग्य सचिवांची माहिती..
गांधीनगर - गुजरातमध्ये आतापर्यंत कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. या पाचही रुग्णांना काल (गुरूवार) व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती, राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या मुख्य सचिव जयंती रवी यांनी दिली.
12:25 March 20
नवी दिल्ली - जगभरामध्ये काल(गुरुवारी) कोरोनाच्या संसर्गामुळे १ हजार ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये काल ४२७ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनपेक्षा जास्त बळी इटलीमध्ये गेले आहेत. चीनमध्ये ३ हजार २४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमधील मृतांचा आकडा ३ हजार ४०५ झाला आहे. त्याखालोखाल इराणमध्ये १ हजार ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.
वाचा :कोरोना कहर : जगभरात मागील २४ तासांत १ हजार ९७ जणांचा मृत्यू; चीनपेक्षा इटलीत मृतांची संख्या जास्त
12:24 March 20
रत्नागिरी - कोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या महिला डॉक्टरमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. या डॉक्टरचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सकांनी ते पुण्याला तपासणीसाठी पाठवलेच नाहीत, असा आरोप या संशयित महिला डॉक्टरने केला आहे.
12:23 March 20
मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचे आणखी ३ नवीन रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५२ वर पोहोचली असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
वाचा :कोरोनाचे ३ नवीन रुग्ण, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ च्या घरात
12:19 March 20
जगभरात कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले आहे. चीनमधील याचा प्रसार आता जवळपास आटोक्यात आला असला, तरी मध्य-पूर्व आशिया, युरोप आणि इतर काही देशांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जगभरात आतापर्यंत सुमारे दोन लाख 45 हजार लोकांना याची लागण झाली असून, सुमारे दहा हजार लोकांचा यात मृत्यू झाला आहे. तसेच, साधारणपणे ८८ हजार लोक यातून बरे झाले आहेत.
भारतात आतापर्यंत सुमारे २०१ जणांना याची लागण झाली असून, पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच साधारणपणे २० लोक बरेही झाले आहेत.