'या' माजी मुख्यमंत्र्यांना ओळखलं का?
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे नवे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
'या' माजी मुख्यमंत्र्यांना ओळखलं का?
श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे नवे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हा फोटो ओमर अब्दुल्ला यांचाच आहे, असे वाटणारच नाही. हे छायाचित्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या अधिकृत टि्वटवर खात्यावरून प्रसिद्ध करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
'हे छायाचित्र पाहिल्यानंतर मी ओमर अब्दुल्ला यांना ओळखूच शकले नाही. मला ओमर यांच्याविषयी खूप वाईट वाटत आहे. हे सर्व आपल्या लोकशाही शासन पद्धती असलेल्या देशामध्ये होत असून या सर्वांचा अंत कधी होणार आहे', असा सवाल ममता बॅनर्जी यांनी टि्वटमध्ये केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना ताब्यात घेतले होते. तेव्हापासून श्रीनगरमध्ये ओमर पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. ओमर अब्दुल्ला यांच्यासह त्यांचे वडील फारुख अब्दुल्ला हेसुद्धा नजर कैदेत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान तब्बल पाच महिन्यांहून जास्त काळ बंद असलेली इंटरनेट सेवा जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पोस्टपेडसह प्रीपेड सीमकार्डवरील २ जी इंटरनेट सेवा खोऱ्यातील सर्व जिल्ह्यात सुरळीत करण्यात आली आहे. मात्र, सोशल मीडियावरील बंदी तशीच ठेवण्यात आली असून फक्त ३०१ परवानगी देण्यात आलेल्या वेबसाईटच नागरिकांना वापरता येणार आहेत.