नवी दिल्ली- निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षेची मागणी देशभरातून होत आहे. तर दुसरीकडे दोषी विनय शर्माने धक्कादायक खुलासा केला आहे. विनय शर्माने दया याचिका दाखल केली नाही. त्याच्या नावाने दिल्ली सरकार आणि तिहार तुरुंग हा खेळ खेळत आहे, असे आरोपीने वकिलांच्या माध्यमातून सांगितले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोपीला बळीचा बकरा बनवण्यात येत आहे, असे आरोपीचे वकील ए. पी सिंग यांनी सांगितले आहे, तर दुसरीकडे दया याचिका विनय कुमार यानेच केली असल्याचे तिहार तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे.
गुन्हेगार विनय कुमारचे वकील हेही वाचा -हैदराबाद बलात्कार पीडितीचे वडील म्हणतात...'त्यांचा' तर जीव गेला आणि समाजातील मान सन्मानही
चौकशीची आरोपीच्या वकिलांची मागणी
निर्भया बलात्कार प्रकरणी आरोपी विनय कुमार तिहार तुरुंगामध्ये आहे. आरोपीने कोणत्याही प्रकारची दया याचिका केली नाही. आरोपीच्या नावाने कोणीतरी ही बनावट याचिका केली आहे. या याचिकेवर आरोपी आणि वकिलांचे हस्ताक्षर नसल्याचे त्यांनी सांगितले. याच्या चौकशीसाठी राष्ट्रपती, राज्यपाल, गृहमंत्री आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तक्रार दिली असल्याचे ए. पी. सिंग यांनी सांगितले.
हेही वाचा -राजधानी दिल्लीमध्ये महिलेवर अॅसिड हल्ला, आरोपी फरार
बेकायदेशीररित्या दाखल झाली याचिका
आरोपी विनय शर्माने ६ डिसेंबरला वकिल ए. पी सिंग यांना पत्र लिहले आहे. मी तिहारमध्ये ४ क्रमांकाच्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगत आहे. ६ डिसेंबर २०१९ ला मी गृहमंत्रालय किंवा दिल्ली सरकारकडे दया याचिका दाखल केली नाही, असे विनय शर्माने वकीलांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात तिहार तुरुंग प्रशासनाने निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना नोटीस पाठवली होती. यामध्ये सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली होती. जर दया याचिका दाखल करायची असेल तर करू शकता, असेही नोटीसीद्वारे सांगण्यात आले होते. त्यानंतर फक्त विनय शर्माने दया याचिका दाखल केली होती. अशी माहिती तिहार तुरुंग प्रशासनाने दिली होती. गृह मंत्रालयातून ही दया याचिका राष्ट्रपतींकडे जाणार होती, अशी महिती देण्यात आली होती. मात्र, ही दया याचिका केली नसल्याचे बलात्कार प्रकरणातील गुन्हेगाराने म्हटले आहे.