नवी दिल्ली - देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले. या लढ्यात सर्वांनी एकमेकांना मदत केली तर आपण हा लढा जिंकू. लॉकडाऊन सलग तिसऱ्यांदा वाढविण्यात आल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होत आहे. अशा कठीण परिस्थितीत दिल्लीतील लष्कारी अधिकाऱ्याची पत्नी दररोज पाच हजार भुकेलेल्यांचे दोन वेळ पोट भरत आहे.
सुमन आर्य या समाजसेविका असून कोरोनामुळे असाह्य आणि गरजू नागरिकांना अन्न पुरवत आहेत. सुमन यांचे पती नरेश आर्य लष्करात असून ते आसाममध्ये कर्नल पदावर कार्यरत आहेत. सुमन यांचे वडील आणि भाऊही लष्करात आहेत. तर त्यांचे सासरेही लष्करात होते. संपूर्ण कुटुंब देशसेवेत असल्याचे सुमन सांगतात. देशभरामध्ये लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर गरींबासाठी काही तरी केले पाहिजे या भावनेतून त्यांनी हा उपक्रम सुरू केला. या कामासाठी पतीने प्रोत्साहन दिल्याचे त्या सांगतात.