नवी दिल्ली -सध्या कर्नाटकात राजकीय नाट्य सुरू आहे. काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत. यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजप पैशाचा वापर करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
भाजप पैशांचा वापर करुन सत्ता पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे आपण गोव्यामध्ये पाहिलेच आहे. गोव्यानंतर आता कर्नाटकमधील सरकार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजप पैशाचा वापर करत आहे. मात्र सत्य हेच काँग्रेसची ताकद असून पक्ष सत्यासाठी लढत असल्याचे ते म्हणाले.
माझी लढाई ही अन्यायाच्या विरूध्द असून मी न्यायासाठी लढतच राहणार आहे. माझ्यावर जितके हल्ले होतील त्याला मी प्रेमानेच उत्तर देणार असून सत्याच्या मार्गावरून दूर जाणार नाही, असे राहुल म्हणाले.
बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यानंतर विद्यमान सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचे १३ आणि अपक्ष ३ असे मिळून १६ आमदारांनी राजीनामा दिला आहे. या सर्व आमदारांनी १३ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या सरकारला समर्थन दिले होते. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात २ अपक्षांना नुकतेच मंत्री बनविण्यात आले होते.
दरम्यान कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना मंगळवारपर्यंत न्यायालयाने वेळ दिला आहे.