पाटणा - बिहारमध्ये पुराने थैमान घातले आहे. जोरदार पावसामुळे तसेच पाणी तुंबल्यामुळे पाटना शहर जलमय झाले आहे. राज्यातील अनेक जिल्हे पुरामुळे प्रभावित झाले आहेत. आत्तापर्यंत ४० लोक दगावल्याचे वृत्त हाती आले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूर प्रभावित भागांची हवाई मार्गाने पाहणी करून आढावा घेतला.
राज्यात १९ एनडीआरएफ पथकांसह बचाव कार्य सुरू आहे. राज्यामध्ये भयंकर पुरपरिस्थिती आहे. ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडलेला आहे. त्यामुळे शहरामध्ये सगळीकडे पाणी तुंबले. राज्यामध्ये १९ राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके मदत कार्यात व्यस्त आहेत. त्यातील ५ पथके एकट्या पटना शहरात आहेत. सोमवारी शहरातून ४ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, असे एनडीआरएफचे महासंचालक एस. एन प्रधान यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री सुशिल मोदी हेही पूर पाहणी करण्यासाठी आले होते. तसेच पूरग्रस्त जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकही घेतली. इंडिगो विमान कंपनीने पाटनामधुन येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांच्या वेळापत्रकामध्ये बदल केले आहेत. तसेच २ ऑक्टोबरपर्यंत तिकीट रद्द केल्यानंतर शुल्क परत देण्यात येणार आहे, अशी माहिती विमान कंपनीने दिली आहे. वायू सेनेच्या मदतीने पुरग्रस्तांना अन्न आणि गरजेचे साहित्य पुरवण्यात येत आहे.