नवी दिल्ली - राम मंदिर-बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (बुधवार) अंतिम युक्तीवाद पूर्ण झाला आहे. याप्रकरणी न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून येत्या २३ दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले असून निकाल राखीव ठेवला आहे. सकाळपासून दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद सुरू होता. त्यानंतर ५ वाजेपर्यंत न्यायालयात सुनावणी सुरू होती. याप्रकरणी १७ नोव्हेंबरला निकाल येण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी सुनावणी १७ ऑक्टोबरपर्यंत संपवण्याचे आदेश दोन्ही पक्षकारांना दिले होते. अयोध्या खटला निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये १० डिसेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आली आहे.
LIVE UPDATE:
- हिंदू महासभेनं सादर केलेल्या पुराव्यांमध्ये तफावत- वरिष्ठ वकील, राजीव धवन, मुस्लीम पक्षाचे वकील
- अयोध्या खटल्यात दावा मागे घेतल्याचा कोणताही अर्ज केला नाही - जफरयाब जीलानी, सुन्नी वक्फ बोर्ड वकील
- दुपारच्या सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरू
- दुपारच्या सुट्टीनंतर मुस्लीम पक्षकार राजीव धवन बाजू मांडणार, दुपारच्या जेवणासाठी सुट्टी झाल्यामुळे न्यायालयाचे कामकाज थांबले.
- दोन्ही पक्षांना बाजू मांडण्याची प्रत्येकी ४५ मिनीटांचा वेळ देण्यात आला आहे.
- हिंदू आणि मुस्लीम पक्षातील वकिलांमधील वादामुळे रंजन गोगोई नाराज. म्हणाले, असे चालू राहीले तर आम्ही न्यायालयातून निघून जाऊ
- हिंदू पक्षाने पुरावा म्हणून सादर केलेले पुस्तक" अयोध्या रिव्हिजिटेड' पुस्तकातील काही पानं मुस्लिम पक्षाच्या वकिलांनी फाडली, न्यायालयाने मुस्लिम पक्षाचे वकिल राजीव धवन यांना खडसावले. कुणाल किशोर यांनी लिहलेल्या पुस्तकातील पुराव्यावर उत्तर देण्यास राजीव धवन यांनी नकार दिला. त्यांनी पुरावे म्हणून काही नकाशे सादर केले.
- आत्ता बस झालं..कोणत्याही परिस्थितीत सुनावणी आज ५ वाजेपर्यं पुर्ण करणार - सरन्यायाधीश, हिंदू पक्षाला (इंटरव्हेशन पिटीशन) याचिका दाखल करण्यापासून न्यायालयाने रोखले. आजच दोन्ही बाजूंचे म्हणणे एकून सुनावणी पूर्ण करणार
सर्वोच्च न्यायालयामध्ये काल(मंगळवारी) सुनावणीचा ३९ वा दिवस होता. आज सुनावणीचा ४० वा दिवस शेवटचा ठरण्याची शक्यता आहे. सरन्यायाधींच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय खंडपीठ या प्रकरणी ६ ऑगस्टपासून सुनावणी घेत आहे. हिंदु-मुस्लीम दोन्ही पक्षकारांना आपआपली बाजू मांडण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.