गुवाहाटी –दरवर्षी धोक्याची पातळी ओलांडणाऱ्या ब्रम्हपुत्रेने यंदाही आसाममध्ये हाहाकार माजवला आहे. पुराच्या नैसर्गिक आपत्तीने मृतांचा आकडा 37 वर पोहोचला आहे. तर 17 जिल्ह्यांच्या 884 गावांना पुराचा फटका बसला आहे.
पुरामुळे आसाममधील 25 लाख 65 हजार 343 लोकांना फटका बसला आहे. तर 1 लाख 68 हजार 210.28 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाल्याची माहिती आसाम आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) आज दिली आहे.
पुरपरिस्थितीमुळे सुमारे 65 हजार 980 लोकांनी सरकारच्या 323 निवारा छावणीचा आश्रय घेतला आहे. नेमाटीघाट (जोरहाट) आणि ढुब्रीमध्ये ब्रम्हपुत्रा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याचे केंद्रीय जल आयोगाच्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर या एनटी रोड (सोनीतपूर) येथील जिया भैराली आणि धर्मतुल(नागाव) येथे कोपीलीने धोक्याची पातळी ओलांडत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
पुरामुळे रस्ते, पूल आणि इतर इमारतींचे नुकसान झाले आहे. राज्यात 24 हून अधिक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.