इटानगर– चीनबरोबर तणावाची स्थिती असताना अरुणाचल प्रदेशने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अरुणाचल प्रदेश सीमावर्ती भागात रस्ते कामाला प्राधान्य देणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
सीमावर्ती भागातील सर्व रस्ते हे रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या रस्त्यांची कामे प्राधान्याने निश्चित मुदतीत वेगाने करण्यात येणार असल्याचे राज्य जमीन व्यस्थापन सचिव डॉ. सोनल स्वरुप यांनी सांगितले.
सीमेलगत असलेल्या सर्व जिल्ह्यातील भूसंपादन, वनविभागाकडून परवानगी आणि संयुक्त सर्वेक्षणाच्या कामावर अरुणाचल प्रदेशच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीला सीमा रस्ते संस्थेचे (बीआरओ) महासंचालक लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह, राज्याचे मुख्य सचिव नरेश कुमार आदी अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचे महासंकट असल्याने मजुरांचा तुटवडा आहे. असे असले तरी राज्याच्या रस्ते महामार्ग आणि पुलाचे काम सुरू असल्याचे बीआरओच्या महासंचालकांनी सांगितले. सीमावर्ती भागात रस्त्यांच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आल्याचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोलताना राज्य सचिवांनी सांगितले.
अरुणाचल प्रदेशाची म्यानमारबरोबर 440 किमीची सीमा आहे. तर भूतानबरोबर 160 किमीची तर चीनबरोबर 1 हजार 80 किमीची सीमा आहे.