लेह -मागील काही महिन्यांपासून चिनी अतिक्रमणाला रोखण्यासाठी लडाखमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. लडाख हा डोंगराळ भूप्रदेश समुद्रसपाटीपासून सुमारे १६ हजार फूट उंचीवर आहे. प्रतिकूल परिस्थिती जवान भारताच्या सीमांचे रक्षण करत आहेत. उणे तापमान आणि हाडे गोठवणाऱ्या थंडीत जवानाचे अॅपेंडिक्सचे ऑपरेशन करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
पूर्व लडाखमधील सीमेजवळच्या लष्करी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. तीन डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली. जवानाची प्रकृती खालावल्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे डोंगराळ भागातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले. अशा परिस्थितीत लष्करी पथकासोबत असलेल्या डॉक्टरांनी तेथेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कडाक्याची थंडी असल्याने डॉक्टरांपुढे अनेक अडचणी होत्या.