नवी दिल्ली - जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच लष्कर प्रमुख बिपीन रावत काश्मीरला भेट देण्यास जाणार आहेत. काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेसंदर्भातील आढावा घेण्याबरोबरच ते लष्कराच्या तयारीचीही पाहणी करणार आहेत. आज (शुक्रवारी) ते श्रीनगरला भेट देणार आहेत.
हेही वाचा - 'काश्मीर तुमचा कधी होता? ज्यासाठी तुमचे नेहमीच रडगाणे सुरू असते' राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
बुधवारी काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काश्मीर खोऱ्यामध्ये आत्तापर्यंत एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचे सांगितले. तसेच राज्यामधील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमिवर लष्करप्रमुख काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यास जाणार आहेत. तसेच लवकरच राज्यामध्ये मोठी नोकरभरती केली जाणार असल्याची घोषणा सत्यपाल यांनी केली.
हेही वाचा - बिथरलेल्या पाकिस्तानचा समुद्रमार्गे भारतावर हल्ल्याचा कट; कांडला बंदराची सुरक्षा वाढवली
किरकोळ हिंसाचाराच्या घटना वगळता काश्मीरातील जनजीवन सामान्य असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच मोठ्या हिंचासाराच्या घटना घडल्याचे वृत्त फेटाळले आहे. ५ ऑगस्टपासून काश्मीरमधील परिस्थिती संवेदनशील झाली आहे. केंद्र सरकारने राज्याचा विशेष दर्जा रद्द करून काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन केल्यानंतर काश्मीरखोऱ्यात तणावपूर्ण परिस्थिती आहे.