नवी दिल्ली - आसाममधील एनआरसी रद्द करण्यावरून 'खोदा पहाड़ निकला चूहा' असे म्हणत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदी पुन्हा एकदा देशातील नागरिकांना रांगेमध्ये उभे करत आहेत, असे टि्वट ओवैसी यांनी केले आहे.
मोदी पुन्हा एकदा देशातील लोकांना रांगेमध्ये उभे करत आहे. ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत त्यांना ताब्यात घेण्यात येईल. अल्पसंख्याक आणि दुर्बल घटकातील लोकांना नोकरशहांच्या दयेवर सोडण्यात येईल, हा सर्व भाजपचा डाव आहे. जगात कुठेच लोकांना अशा अडचणींमधून जावे लागत नसेल, असे ओवैसी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
बुधवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी एनआरसी देशभरात लागू होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आसाम राज्य सरकारने सध्या राज्यात लागू असलेली एनआरसी यादी रद्द करण्याची मागणी केली आहे. पूर्वीच्या एनआरसीमध्ये अनेक उणिवा असल्याचे आसामचे अर्थमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आसाममध्ये एनआरसी यादीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. ३१ ऑगस्टला प्रसिद्ध झालेल्या, आसाम राज्याच्या राष्ट्रीय नागरिकत्व यादीमधून साधारणपणे १.९ दशलक्ष लोक वगळले गेले होते. या वगळल्या गेलेल्या लोकांना आपण भारतीय असल्याचे सिद्ध करण्यासाठी १२० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.