नवी दिल्ली - वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी वकील गौरी मौलेखी यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान प्रियांका गांधींनी हातात साप पकडले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वन्यजीव असलेल्या सापांना अशा प्रकारे हाताळणे कायदाबाह्य असून यासाठी त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे मौलेखी यांनी म्हटले आहे. त्या सामाजिक कार्यकर्त्याही आहेत.
प्रियांका गांधींवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाईची मागणी
'प्रियांका यांच्या या कृत्यामुळे लोकही अशा कृती करण्यास प्रवृत्त होऊ शकतात. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास लोकांचेही धाडस वाढेल. क्षुल्लक फायद्यासाठी, प्रचार करताना प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची कृत्ये करणे योग्य नाही,' असे मौलेखी यांनी म्हटले आहे.
'काँग्रेस उत्तर प्रदेश महासचिव प्रियांका यांच्या या कृत्यामुळे लोकही अशा कृती करण्यास प्रवृत्त होऊ शकतात. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास इतर लोकांचेही धाडस वाढेल. काही क्षुल्लक फायद्यासाठी निवडणूक प्रचार करताना प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची कृत्ये करणे योग्य नाही. यामुळे भारतातील सापांची संख्या आणखी वेगाने कमी होण्यास सुरुवात होईल,' अशा आशयाचे पत्र उत्तर प्रदेशचे मुख्य वन्यजीव देखरेख अधिकाऱ्यांना मौलेखी यांनी पाठवले आहे.
या पत्राचा सेक्शन ५५ वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत विचार केला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासह या प्रसंगाचे व्हिडिओ आणि वृत्त अहवालही पुराव्यादाखल जोडण्यात आले आहेत. याविषयी काँग्रेस पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सापाचे खेळ करणाऱ्या आणि लोकांचे मनोरंजन करणाऱ्या एका व्यक्तिसमोर प्रियांका बसल्या असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. त्याही हसत-हसत सापाला हातात पकडत असल्याची कृती या व्हिडिओत कैद झाली आहे.