नवी दिल्ली -गाडिया लोहार समाजातील महिलांनी तयार केलेल्या राख्या गलवाण खोऱ्यात आणि लडाखमध्ये तैनात असलेल्या जवानांना पाठवण्यात येणार आहेत. जवानांच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी गाडिया लोहार समाजातील महिला अहोरात्र राखी तयार करण्याचे काम करत आहेत.
मोगलांच्या विरुद्ध लढण्यासाठी गाडिया लोहार समाजाचे पूर्वज महाराणा प्रताप यांच्यासाठी शस्त्रे बनवत. याचा या समाजातील महिलांना अभिमान आहे. ज्याप्रमाणे आपले पूर्वज शस्त्रे बनवत. त्याचप्रमाणे या महिला आपल्या लष्करी भावांसाठी राख्या तयार करत आहेत. जेणेकरून ते प्रत्येक लढाईत यशस्वी होतील.
पूर्व दिल्लीतील नंद नगरी भागात राहणाऱया गाडिया लोहार समाजातील महिलांनी सांगितले की, सीमेवर तैनात जवानांसाठी आम्ही राखी तयार करीत आहेत. दरम्यान या महिलांना राखी तयार करण्यासाठी सेवा भारती संस्थेचे सहकार्य लाभले आहे. या महिलांना राखी तयार करण्यासाठी सेवा भारती संस्थेच्या तज्ञांनी प्रशिक्षण दिले आहे.
गाडिया लोहार समाजातील लोक कला क्षेत्रात कुशल आहेत. म्हणूनच ते नवीन कौशल्ये शिकण्यात खूप वेगवान आहेत. या महिला थोड्याच मार्गदर्शनात राख्या तयार करायला शिकल्या आहेत. त्यांना याबाबत जास्त प्रशिक्षण द्यावे लागले नाही, असे सेवा भारती संस्थानच्या राजश्री म्हणाल्या.