कोलकाता - हृदयविकार असलेल्या आपल्या मुलाच्या उपचारासाठी कुटुंबीय वणवण फिरत होते. मात्र, तीन रुग्णालयांनी त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर त्याला कोलकाता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा शुक्रवारी मृत्यू झाला.
सुभ्रजित चट्टोपाध्याय असे तरुणाचे नाव आहे. कोलकाता मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलने (केएमसीएच) सुभ्रजितला दाखल करून घेण्यास नकार दिला. मात्र, मुलावर उपचार न केल्यास रुग्णालयासमोर आत्महत्या करण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी सुभ्रजितला दाखल करून घेतले, असे सुभ्रजितच्या वडिलांनी सांगितले.
सुभ्रजित मधुमेहाचा रुग्ण होता. शुक्रवारी सकाळी त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आम्ही त्याला कमरहाटी येथील ईएसआय रुग्णालयात नेले. मात्र, त्यांनी आयसीयूमध्ये बेड खाली नसल्याचे सांगून दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर आम्ही त्याला एका खासगी नर्सिंग होममध्ये नेले. तिथे त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनीही रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिला.
त्यानंतर आम्ही शासकीय संचलित सागर दत्ता रुग्णालय गाठले. मात्र त्यांनीही सुभ्रजितवर उपचार करण्यास नकार दिल्यावर आम्ही पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी सुभ्रजितला केएमसीएच येथे नेण्याचा सल्ला दिला. कोरोना रुग्ण असल्याचे सांगितल्यावर केएमसीएचनेही सुभ्रजितला दाखल करून घेण्यास नकार दिला. मात्र, मुलावर उपचार न केल्यास रुग्णालयासमोर आत्महत्या करण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी दाखल करून घेतले, असे सुभ्रजितच्या आईने सांगितले.
धमकीनंतर त्यांनी माझ्या मुलाला दाखल करून घेतले. मात्र, त्याला कोणतेही औषध देण्यात आले नाही. आम्ही त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. पण, आम्हाला कुणीही कोणत्याही प्रकारे मदत केली नाही. जेव्हा आम्ही चौकशी विभागात गेलो, तेव्हा समजले की, रात्री 9.30 च्या सुमारास आमच्या मुलाचा मृत्यू झाला, असे सुभ्रजितच्या वडिलांनी सांगितले.