चंदिगड - हरियाणा येथील फरीदाबादमध्ये एका वीट भट्टी मालकाने १७ मजूरांना बंधक बनवून ठेवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हे मजूर मागील अनेक दिवसांपासून या वीट भट्टी मालकाकडे काम करत आहेत. त्यांना कामाचा मोबदला तर मिळत नाहीच पण, काम सोडून जाण्याची ईच्छा असतानाही त्यांना बळजबरीने बंधक बनवून ठेवण्यात आले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७ दशके उलटून गेली आहेत. मात्र, आजही गरिबांची पिळवणूक सुरूच आहे. एवढेच नाही, तर आपले काम काढून घेण्यासाठी त्यांना गुलाम म्हणून राबवले जात आहे. फरीदाबादच्या पृथला विधानसभा मतदार संघामधून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
काही वर्षापूर्वी छत्तीसगडमधून १७ कुटूंब आपल्या लहान मुलांना घेऊन रोजगाराच्या शोधात हरियाणामध्ये आले होते. त्यावेळी त्यानी एका वीट भट्टीवर काम करण्यास सुरूवात केली. मात्र, हेच काम त्यांच्यासाठी आता त्रासदायक ठरत आहे. आपण काम करत नाही, म्हणून मालकाने रात्री भट्टीवर चौकीदार नेमले आहेत. ते चौकीदार मध्यरात्री येऊन आम्हाला त्रास देतात. आमच्या महिलांचीही छेड काढतात, असे त्या मजुरांचे आरोप आहेत.
पहा काय म्हणणे आहे त्या कुटुंबीयांच
आपल्याला हे काम सोडून जायचे आहे. मात्र, भट्टी मालक आम्हाला काम सोडून जाऊही देत नाही. आमच्याकडून बळजबरीने काम करून घेतले जात आहे. त्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारची मजूरी दिली जात नाही. दिवसभर आमच्यावर अत्याचार केले जातात, असेही त्या मजूरांचे म्हणणे आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली आहे. तसेच संपूर्ण प्रकणाचा कसून तपास करण्याची हमीही त्यांनी दिली आहे. मात्र, २१ व्या शतकातही, अशा प्रकारची घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.