तिरूवअनंतपुरम -एका बारा वर्षाच्या मुलीला शबरीमला मंदिरात जाण्यापासून केरळ पोलिसांनी अडवले. आज (मंगळवार) दुपारी ही घटना घडली. तिचे ओळखपत्र पाहिल्यानंतर वय लक्षात आल्याने तिला अडवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी आपल्या कुटुंबीयांसह अयप्पास्वामीच्या दर्शनासाठी आली होती. मात्र, केरळ पोलिसांनी तिला दारातच अडवले, आणि पुढे जाण्यापासून रोखले. मंदिर प्रशासनाच्या आदेशानुसार, अय्यपास्वामींनी ब्रह्मचर्याची शपथ घेतली होती. त्यामुळे १० ते ५० वर्षांपर्यंतच्या महिला (ज्या वयात महिलांना मासिक पाळी येते) या मंदिरात प्रवेश करू शकत नाहीत.
कित्येक शतकांपासून महिलांना या मंदिरात जाण्यापासून बंदी आहे. २८ सप्टेंबर २०१८ला सर्वोच्च न्यायालयाने महिलांवरील ही बंदी उठवली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या एका पाच न्यायधिशांच्या खंडपीठाने, ही बंदी म्हणजे लिंगभेद आहे, आणि हिंदू महिलांच्या हक्कांचे उल्लंघन असल्याचा निर्वाळा देत ही बंदी उठवली होती. त्यानंतर या निर्णयाविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर, हा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला गेला. त्यामुळे, अंतिम निकाल लागेपर्यंत मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते.
दरम्यान, माजी सरन्यायाधीश गोगोई यांच्या आदेशानुसार, १६ नोव्हेंबर २०१९ला दोन महिने चालणाऱ्या तीर्थयात्रा मंडला-मकरविलक्कूसाठी मंदिराचे दरवाजे कडक सुरक्षा व्यवस्थेत उघडण्यात आले आहेत.
हेही वाचा :शबरीमला मंदिराचे दरवाजे उघडले, पहिल्याच दिवशी १० भाविक महिलांना पाठवले परत