रोम -जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही काही ठिकाणी सकारात्मक बाबी घडत आहेत. कोरोनाचा प्रचंड फटका बसलेल्या इटलीमध्ये चक्क एका १०३ वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली आहे. अदा जानुसी असे या शंभरी पार केलेल्या आजीबाईचे नाव आहे.
अदा जानुसी या कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यांनी फक्त ताप कमी होणाऱ्या गोळ्या खाऊन आणि शरिरात पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवून कोरोचा सामना केला आहे. अदा यांना मार्चमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आठ दिवस सलग त्यांना ताप येत राहिला. हळूहळू त्यांनी जेवण-पाणी बंद केले आणि त्या बेशुद्ध होत गेल्या. त्यानंतर मात्र डॉक्टरांना त्यांना हायड्रेट करण्यास सुरुवात केली. सात दिवसानंतर त्या शुद्धीवर आल्या.