बंगळुरू -भाजपा नेते बसवराज बोम्मई यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडून सत्तेत आलेले मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सोमवारीआपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. बसवराज बोम्मई हे येडियुरप्पा यांच्याच मर्जीतील व्यक्ती आहेत.
मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बसवराज बोम्मई यांचे नाव प्रस्तावित केले. ते एकमताने मंजूर झाले.
26 जानेवारी 1960 रोजी जन्मलेल्या बसवराज सोमप्पा बोम्माई कर्नाटकचे गृह, कायदा, संसदीय कार्यमंत्री आहेत. त्यांचे वडील एसआर बोम्मई हेसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. अभियांत्रिकीचे पदवीधर असलेल्या बसवराज यांनी जनता दलापक्षातून राजकारणाची सुरूवात केली. 1998 आणि 2004 मध्ये ते दोन वेळा धारवाडमधून कर्नाटक विधानपरिषदेवर निवडून गेले होते. यानंतर त्यांनी जनता दल सोडला आणि 2008 मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्याच वर्षी ते हवेरी जिल्ह्यातील शिगगाव येथून आमदार म्हणून निवडून गेले.
बसवराज पाटबंधारे प्रकरण तज्ञ
बसवराज सिंचन बाबींमध्ये तज्ञ मानले जातात. राज्यात अनेक सिंचन प्रकल्प सुरू केल्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. आपल्या मतदारसंघात भारताचा पहिला 100% पाईप सिंचन प्रकल्प राबविण्याचे श्रेयही त्यांना जाते.
कर्नाटकात लिंगायत समुदायाचे संख्याबळ -
कर्नाटकातील लोकसंख्येमध्ये लिंगायत समुदायाचा वाटा सुमारे 17% आहे. राज्यातील 224 विधानसभा जागांपैकी जवळपास 90-100 जागांवर लिंगायत समाजाचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत भाजपाला येडियुरप्पा यांना हटविणे सोपे नव्हते. त्यांना काढून टाकणे म्हणजे या समुदायाची मते गमावण्याचा धोका होता.
काँग्रेस-जेडीएस सरकार पाडून येडियुरप्पा सत्तेत -
कर्नाटकात 2018 ला विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि राज्यात काँग्रेस-जेडीएस सरकार स्थापन झाले. मात्र, 2019 च्या जुलैमध्ये काँग्रेसच्या 17 आमदारांनी बंडखोरी करत राजीनामा दिला. त्यानंतर बहुमत चाचणीत अपयशी काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळले आणि येडियुरप्पा सत्तेत आले होते. येडियुरप्पासंदर्भात राज्यातील भाजपामध्ये नाराजीचे वातावरण होते. थेट मुख्यमंत्री बदलण्याची मागणी एका गटाने केली काही दिवसांपूर्वीच केली होती. आगामी विधानसभा निवडणूक बी.एस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात लढता येणार नाही. म्हणून मुख्यमंत्री 100 टक्के बदलला पाहिजे, अशी मागणी भाजपा आमदाराच्या एका गटाने केली. तेव्हापासून येडियुरप्पा यांची उचलबांगडी करण्यात येणार, अशी चर्चा सुरू होती.
भाजपासाठी येडियुरप्पा म्हत्त्वाचे -
भारतीय जनता पक्षानं 2019 साली 75 वर्षांच्या आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नेत्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवण्याचं धोरण सोडलं आणि बी. एस. येडियुरप्पा यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी बसवलं होतं. त्यापूर्वी 2008 साली येडियुरप्पा जेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते दक्षिण भारतातले भाजपाचे पहिलेच मुख्यमंत्री होते.कर्नाटकच्या राजकारणातील अनुभवी नेता आणि लिंगायत समाजातील नेता म्हणून बी. एस. येडियुरप्पा यांचं राज्यात वर्चस्व राहिलं आहे. येडियुरप्पा यांनी दक्षिण भारतात भाजपासाठीचे दरवाजे उघडे केले होते. आता बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वात पुढील निवडणूक भाजपा जिंकते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.