प्रयागराज :एक काळ असा होता की, उत्तर प्रदेशातील लोकं अतिक अहमदला घाबरायचे. मात्र आता अतिकला स्वतःच्या जीवाची काळजी वाटू लागली आहे. रविवारी गुजरातच्या साबरमती कारागृहातून यूपी पोलीस अतिकसोबत बाहेर आले तेव्हा माफियाचा चेहरा उडालेला होता. तुरुंगात आणि न्यायालयात जाताना हस्तांदोलन करून लोकांना अभिवादन करणाऱ्या अतिकला पहिल्यांदाच धक्का बसलेला दिसला. तुरुंगातून बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावर तीच भीती होती जी त्याच्या विरोधकांच्या चेहऱ्यावर नेहमी दिसायची.
अतिकच्या चेहऱ्यावर भीती दिसून आली :24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल यांच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत माफियांना जमीनदोस्त केले जाईल, असे विधान केले होते. यानंतर माजी खासदार आणि बाहुबली अतिक अहमद सरकारच्या निशाण्यावर होता. रविवारी तुरुंगातून बाहेर येताना त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसून आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पोलिस व्हॅनमध्ये बसत असताना अतिक अहमदने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत दोनदा जीवे मारण्याची शक्यता व्यक्त केली. पोलिस व्हॅनमध्ये चढण्यापूर्वी आणि व्हॅनमध्ये बसल्यानंतर त्याने आपल्याला मारले जाईल असे अनेक वेळा सांगितले.
अतिकला एन्काउंटरची भीती : रविवारी गुजरातमधून अतिक अहमदला आणण्यासाठी यूपी पोलीस साबरमती कारागृहात पोहोचले, तेव्हा अतिकने प्रयागराजला जाणे टाळण्याचा प्रयत्न केला. त्याने तब्येत बरी नसल्याचे कारण पुढे केले. साबरमती कारागृहातील डॉक्टरांच्या पथकानेही त्याची नियमित तपासणी केली. त्यानंतरच अतिकला गुजरातहून प्रयागराजला पाठवण्यात आले. अतीक अहमदला प्रयागराजला आणण्यासाठी पोलिस व्हॅनमध्ये बसवले जात असताना, त्याने आपल्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल वारंवार सांगितले. अतिक अहमदला आता 1200 किलोमीटरहून अधिक प्रवास करत उत्तर प्रदेशात वापस जायचे आहे. मात्र वाटेतच त्याला त्याचा गॅंगस्टर विकास दुबे प्रमाणेच एन्काउंटर होण्याची भीती वाटते आहे.
कुटुंबाने देखील व्यक्त केली भीती : अतिक अहमद याच्या पत्नीनेही हीच भीती व्यक्त केली आहे. यासोबतच अतिक अहमदची बहीण आणि त्याचा धाकटा भाऊ खालिद अझीम उर्फ अश्रफची पत्नीही मीडियासमोर आली आणि त्यांनी त्याचा एन्काउंटर होण्याची भीती व्यक्त केली. अतिक अहमद आणि अशरफ यांना तुरुंगातून प्रयागराजला आणत असताना वाटेत चकमकीच्या नावाखाली मारले जाऊ शकते, असे ते म्हणाले.
हेही वाचा :Atiq Ahmed Update : अतिक अहमदला घेऊन युपी पोलीस रवाना; कडेकोट बंदोबस्त तैनात