प्रयागराज (उत्तरप्रदेश)/ नवी दिल्ली : प्रयागराज येथील एमपी एमएलए न्यायालयाने मंगळवारी 2006 च्या उमेश पाल अपहरण प्रकरणात गुंड, राजकारणी अतिक अहमद आणि इतर दोघांना दोषी ठरवले. विशेष एमपी एमएलए न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश चंद्र शुक्ला यांनी या प्रकरणात अहमद, वकील सौलत हनिफ आणि दिनेश पासी यांना दोषी ठरवले, असे सरकारी वकील गुलाब चंद्र अग्रहरी यांनी सांगितले. अहमदचा भाऊ खालिद अझीम उर्फ अश्रफसह इतर सात जणांना या खटल्यातून निर्दोष मुक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
२००७ मधील आहे घटना:25 जानेवारी 2005 रोजी तत्कालीन बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्येनंतर, तत्कालीन जिल्हा पंचायत सदस्य उमेश पाल यांनी पोलिसांना सांगितले होते की ते हत्येचा साक्षीदार आहेत. उमेश पाल यांनी आरोप केला होता की, जेव्हा त्याने अहमदच्या दबावाखाली माघार घेण्यास नकार दिला तेव्हा 28 फेब्रुवारी 2006 रोजी त्याचे बंदुकीच्या जोरावर अपहरण करण्यात आले. त्यानंतर अहमद, त्याचा भाऊ आणि इतरांविरुद्ध 5 जुलै 2007 रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयातही झटका:या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांविरुद्ध आरोपपत्र सादर केले होते. त्यातील एकाचा नंतर मृत्यू झाला. अहमद आणि अश्रफ यांच्यावरही उमेश पाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. उमेश पाल यांची प्रयागराज येथील त्यांच्या राहत्या घराबाहेर २४ फेब्रुवारी रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दुसरीकडे अतिक अहमदच्या सुरक्षेची मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अतिक अहमदच्या वकिलाला आपल्या तक्रारींसह उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. उमेश पाल हत्येप्रकरणी गँगस्टर अतिक अहमदने उत्तर प्रदेशातील तुरुंगात हलवण्यात आल्याने आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती दाखवत याचिका दाखल केली होती.