नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी आज गुरुवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतील सभागृह नेते पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग, राज्यसभा सदस्य आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत अनिल अँटनी यांनी भाजपच्या नवीन मुख्यालयात पक्षात प्रवेश केला.
देशाच्या सार्वभौमत्वावर परिणाम : अनिल यांनी या वर्षी जानेवारी महिन्यात काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (बीबीसी) 2002 च्या गुजरात दंगलीवर आधारित माहितीपट हा भारतीय संस्थांच्या विचारांवर धोकादायक प्रवृत्ती असल्याचे वर्णन करताना ते म्हणाले की याचा देशाच्या सार्वभौमत्वावर परिणाम होईल. या प्रतिक्रियेनंतर त्यांना काँग्रेसमधून टीकेला सामोरे जावे लागले.
भाजपच्या भविष्यासाठी मोदी यांचे मार्गदर्शन : यानंतर त्यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. ए के अँटनी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, त्यांनी केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्र्यासारखे महत्त्वाचे पद भूषवले आहे, हे विशेष. पियुष गोयल यांनी अनिल अँटनी यांचे पक्षात स्वागत करत त्यांना औपचारिकरित्या सामील करून घेतले. यादरम्यान पीयूष गोयल म्हणाले की, गुरुवारी सकाळी भाजपच्या भविष्यासाठी मोदी यांचे मार्गदर्शनाचा आणि भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी 'अमृत काल'मध्ये उचललेल्या पावलेचा आम्हाला खूप फायदा झाला.