नवी दिल्ली - ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावर कब्जा मिळवून झेंडा फडकावल्याच्या घटनेला केंद्रीय गृह मंत्रालयाने गांभीर्याने घेतले आहे. दिल्लीमधील विविध भागांत शेतकऱ्यांनी पोलिसांवर हल्ले केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून गृहमंत्री अमित शाह आणि सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी निवासस्थानी बैठक घेतली.
दिल्लीत अतिरिक्त सुरक्षा तैनात -
अतिरिक्त सुरक्षा बल तैनात करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले आहेत. ज्या आंदोलकांनी हिंसाचार केला त्यांची ओळख पटवण्यात येत असून अटक सत्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. भविष्यात पुन्हा हिंसाचाराची घटना होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दिल्लीतील अनेक ठिकाणी आज वाहतूक वळवण्यात आली असून आयटीओ या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. लाल किल्ला आणि जामा मशीद मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली असून अनेक भागातील इंटरेट सेवा काही काळासाठी बंद ठेवली आहे. कालच्या हिंसाचारात आत्तापर्यंत दिडशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ४१ पोलीस लाल किल्ल्यावर, ३४ पूर्व दिल्ली भागात, ३० द्वारका जिल्ह्यात, २७ पश्चिम दिल्ली, १२ आउटर नॉर्थ आणि पाच पोलीस शाहदरा जिल्ह्यात जखमी झाले आहेत. दोन पोलिसांची प्रकृती गंभीर असून किरकोळ जखमी झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दंगल, लुटमार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल -
दंगल, लुटमार करणे, पोलिसांची बंदुका हिसकाऊन घेणे, पोलिसांवर हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसा या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर काल लाल किल्ल्यावर ताबा घेतल्यानंतर रात्री उशीरा अनेक शेतकरी बाहेर निघून गेले होते. मात्र, सुमारे १०० शेतकरी आतच राहिले होते. त्यांना दिल्ली पोलिसांनी शीशगंज येथील गुरुद्वाऱ्यात रात्री ठेवले होते. या प्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांची ओळख पटवत आहेत.