वडोदरा (गुजरात): वडोदरासह राज्यभरात रामनवमी उत्साहात साजरी केली जात आहे. रामजी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी होत आहे. वडोदरा शहरातील अनेक भागातून रामनवमीच्या मिरवणुका निघत आहेत. वडोदरा शहरातील फतेपुरा भागात रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान अचानक दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. दगडफेकीमुळे परिस्थिती चिघळू नये यासाठी संपूर्ण परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
अतिसंवेदनशील परिसर : अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या वडोदरातील फतेपूर परिसराला आता पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. शहरातील आणखी एका रामनवमी मिरवणुकीच्या संदर्भात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडोदरा शहर पोलीस सतत गस्त घालत आहेत. सध्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने शहरभर रामनवमीच्या मिरवणुका काढण्यात येत असताना या मिरवणुकीत ही घटना उघडकीस आली आहे.
पोलिस काय म्हणतात: घटनास्थळी पोहोचलेले डीसीपी यशपाल जगनिया यांनी सांगितले की, उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांसह ताफा घटनास्थळी पोहोचला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरातील सर्व मिरवणुकांसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.