हैदराबाद : भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाईल उत्पादकांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीनं पहिल्या इलेक्ट्रिक विटाराची चाचणी केल्याची माहिती समोर आली आहे. मारुती लवकरच ई विटारा ही पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून लाँच करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीनं एसयूव्हीची क्रॅश-टेस्ट केली आहे. लाँचपूर्वी क्रॅश टेस्टबद्दल कोणती माहिती समोर आली जाणून घेऊया....
क्रॅश चाचणी
या वर्षी, भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये, मारुती सुझुकीनं त्यांची पहिली इलेक्ट्रिक विटारा सादर केली. 500 किमी पेक्षा जास्त रेंज देणारी ई-विटारा लवकरच भारतात लाँच होणार आहे. परंतु तिची क्रॅश चाचणी लाँच होण्यापूर्वीच घेण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती ई-विटारानं विविध क्रॅश टेस्टमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तथापि, ही भारत एनसीएपी किंवा ग्लोबल एनसीएपी कडून अधिकृत चाचणी नाही, तर मारुती सुझुकीनं घेतलेली अंतर्गत चाचणी आहे. ई-विटारा केवळ भारतातच नाही तर युरोपसह अनेक जागतिक बाजारपेठांमध्ये विकली जाईल.
7 एअरबॅग्जसह पूर्ण सुरक्षितता
नवीन ई-विटारा इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. त्यात 49 किलोवॅट आणि 61 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. हा पॅक 500 किमी पेक्षा जास्त रेंज देतो. ई विटारा गुजरात प्लांटमध्ये तयार केली जाणार आहे. तेथून ही कार जपान आणि युरोपमध्ये निर्यात केली जाईल. ही कार नेक्सा आउटलेटद्वारे विकली जाणार आहे. सुरक्षेसाठी, यात 7 एअरबॅग्ज, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, 360-डिग्री कॅमेरे आणि लेव्हल-2 ADAS सारखी वैशिष्ट्ये दिली जातील. लांबी 4275 मिमी, रुंदी 1800 मिमी, उंची 1635 मिमी, व्हीलबेस 2700 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 18 ते 20 लाख रुपये असू शकते.
बुकिंग सुरू?
ई विटाराची बुकिंग सुरू झाल्याची बातमी आहे. ग्राहक 25,000 रुपये टोकन रक्कम देऊन ही कार बुक करू शकतात. परंतु बुकिंग फक्त डीलरशिप स्तरावरच होत आहे, कंपनीकडून अद्याप याबाबत कोणतेही माहिती आलेली नाहीय. भारतात लॉंच झाल्यावर या कारची किंमत लवकरच कळेल. भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी 2030 पर्यंत देशातील आपला बाजार हिस्सा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी करत आहे.
हे वाचलंत का :