अमरावती- सुपारी ज्यानं फोडतो तो अडकित्ता हा मराठी शब्द नाही. अडकित्ताच काय तर रिकामटेकडा, डबा, मेज, दलाल, अर्ज, ताई, अण्णा, कोबी, मुळा, गाजर, फडणवीस, चिटणीस, दिवाळीच्या फराळात असतो तो अनारसा असे अनेक शब्द हे मराठीतले नाहीत. आज हे शब्द मात्र मराठी शब्द म्हणूनच रुढ झालेत, असे अनेक परकीय भाषेतील शब्दांनी मराठी भाषा ही समृद्ध झालीय. प्रख्यात कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आज मराठी भाषा गौरव दिन साजरा होतोय. यानिमित्तानं मुळातच शब्द सौंदर्यानं सजलेल्या मराठी भाषेत बाहेरून आलेल्या शब्दांसंदर्भात "ईटीव्ही भारत"चा हा स्पेशल रिपोर्ट.
संस्कृतचा मराठी भाषेवर प्रभाव : संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेले तत्सम शब्द म्हणजे पाणी तसेच आणि हे दोन शब्द संस्कृतच आहेत. संस्कृतमधून मराठीत येताना गृह हा शब्द घर झाला. दुग्ध संस्कृत शब्द दूध झाला, या शब्दांना तद्भाव शब्द म्हणतात. संस्कृत भाषेनं इतर भाषांतील शब्द कधीही स्वीकारले नाहीत. संस्कृतमध्ये पेढा या शब्दाला दुग्ध शर्करा मिश्रित घनगोल घट्ट असंच म्हणावं लागेल जे फार कठीण आहे. यामुळंच संस्कृत अधिक विकसित होऊ शकली नाही, मात्र मराठी भाषा ही कायम लवचिक राहिली, अशी माहिती इतिहास आणि मराठी भाषांचे अभ्यासक प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना दिलीय.
मराठीवर फारसी भाषेचा प्रभाव : अनेक वर्ष राज्यकर्ते हे आणि अरबी भाषा बोलणारे आल्यामुळं या भाषेचा सर्वाधिक प्रभाव मराठी भाषेवर आहे. सामना, ऊर्फ, अर्ज, पेशवा असे शब्द फारसी भाषेतून मराठीत आलेत. फारसी भाषेचा इतका प्रभाव होता की फडणवीस, चिटणीस हे संबंधित काम करणाऱ्यांसाठी वापरले जाणारे शब्द पुढे ते काम करणाऱ्यांची आडनावं झालीत. अरबी भाषेतील अक्कल, नुकसान, तक्रार हे मराठीत रुळलेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी फारसी भाषेचं प्रभुत्व कमी करण्यासाठी राज व्यवहार कोष निर्मिती करून फारसी भाषेचा प्रभाव कमी करून मराठी भाषा वाढावी, यासाठी खास प्रयत्न केलेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठी भाषा संवर्ध मराठीचं हे महान कार्य होतं, असंदेखील प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी सांगितलं.
कानडी आणि गुजराती शब्द : महाराष्ट्राला लागून असणाऱ्या राज्यातील भाषेचा प्रभाव हा मराठी भाषेवर पडलेला जाणवतो. कर्नाटकाच्या कानडी भाषेतून आलेले ताई, अण्णा, आक्का, अडकित्ता हे शब्द कानडी आहेत. हे शब्द मराठीतले नसले तरी आज ते सर्रास मराठी म्हणूनच वापरले जातात.
गुजराती आणि पोर्तुगीज शब्द : रिकामटेकडा, डबा, दलाल हे शब्द आपल्या शेजारच्या गुजरातच्या गुजराती भाषेतले आहेत. महाराष्ट्राच्या खाली लागून असणाऱ्या गोव्यात 1510 ते 1961 पर्यंत पोर्तुगीजांची दीर्घकाळ सत्ता होती. त्यामुळं पोर्तुगीज शब्द देखील बेमालूमपणे मराठीत मिसळलेत. बटाटा, कोबी, मुळा, गाजर, मेज हे पोर्तुगीज शब्द आहेत. तामिळनाडू राज्यातील तमीळ भाषेतून आलेला अनारसा हा पदार्थ आणि शब्द मराठीत आला आहे.
मराठी भाषा ही अभिजात : अनेक भाषांतील शबर मराठीत आले असले तरी मराठी भाषेतील अनेक मूळ शब्द आहेतच. झाड, धोंडा असे अनेक शब्द मराठीतलेच. मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा दिला ही सर्व मराठी माणसांसाठी गौरवाचीच बाब आहे, त्यामुळेच विविध साहित्य मराठी भाषेत आलं. अनेक लेखक आणि साहित्यिकांनी याला हातभार लावला, असंदेखील प्रा डॉ. वैभव मस्के म्हणालेत.
हेही वाचा :