छत्रपती संभाजीनगर Woman nailed : आधुनिक जगात विज्ञान अधिक प्रगत होत असतानाच दुसरीकडे अघोरी प्रकार होत असल्याचं पुन्हा समोर आलंय. गंगापूर शहरातील एका महिलेवर जामगावमध्ये अघोरी प्रकार करण्यात आलाय. मूलबाळ होत नसल्यानं तुझ्या अंगात तृतीय पंथियाचा आत्मा असल्याचं सांगत काठीनं मारहाण करत तोंडात हिरव्या मिरच्या कोंबल्या, तर अंगावर खिळे ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत अघोरी बाबा हकीम मुक्तार शेख आणि त्याची आई आबेदा शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिलीय.
सदरील घटनेतील आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. दिलेल्या तक्रारीनंतर मांत्रिक आणि त्याच्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही नोटीस दिली आहे. - सत्यजित ताईतवाले, पोलीस निरीक्षक, गंगापूर
मुलबाळ होत नसल्यानं भोंदूबाबाकडे धाव : गंगापूर येथील 35 वर्षीय विवाहितेला बाळ होत नसल्यानं ती त्रस्त होती. लग्नाला तेरा वर्षे झाली तरी बाळ होत नसल्यानं त्यांनी वेगवेगळ्या रुग्णालयात जाऊन उपचार देखील घेतले. मात्र, त्याचा काही फरक पडला नाही. त्यावेळी 2022 मध्ये नात्यातील जामगाव इथं राहणारी आबेदा शेख हिनं महिलेच्या पतीला "माझा मुलगा शरीरातील काही व्याधी असेल तर तो पाहतो. भूतबाधा, करणी, काळी जादू यासारखे प्रकार त्याला येतात आणि तो तुम्हाला नक्कीच मदत करु शकतो. त्यामुळं तुम्ही एकदा त्याच्याकडे या म्हणजे तो तुम्हाला मार्गदर्शन करेल," असं तिनं सांगितलं. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडित महिला पतीसह भोंदूबाबा हकीम शेख याच्याकडं गेली. त्यानं तिच्या कपाळाला अंगारा लावून "तिच्या अंगात तृतीयपंथियाचा आत्मा असल्याचं सांगितलं. यावर आपल्याला पुढं काही दिवस उपचार करावे लागतील, त्यानंतर तिला मूल होईल," असं भोंदूबाबानं सांगितलं.
उपचार करण्याच्या नावावर छळ : 2022 मध्ये पहिल्यांदा या भोंदूबाबाच्या घरी गेल्यावर महिलेच्या शरीरात तृतीयपंथियाचा आत्मा आहे आणि तो तिला सोडायला तयार नाही, असं सांगून उपचाराला सुरुवात करण्यात आली. दरवेळेस वेगवेगळ्या प्रकारचे अघोरी प्रकार करण्यात आले. महिला 18 एप्रिल रोजी हकीम याच्या घरी गेली असताना तिच्या तोंडात बळजबरीनं हिरव्या मिरच्या कोंबल्या, महिला प्रतिकार करत असताना हकीम शेखनं तिला काठीनं जबर मारहाण केली आणि तुला आता या आत्म्याचा त्रास होणार नाही, असं सांगत अंगात खिळे ठोकले. त्यानंतर त्यांना घरी जाण्यास त्यांना परवानगी दिली.
महिलेच्या कुटुंबियांनी गाठलं पोलीस स्टेशन : अघोरी उपचार घेतल्यानंतर महिला गंगापूर येथे आपल्या घरी आली. त्यावेळी तिला चालताही येत नव्हतं किंवा उठण्यासही खूप त्रास होऊ लागला. त्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि कुटुंबीयांनी पोलिसात हा सर्व प्रकार सांगण्याचं ठरवलं. त्यांनी 26 एप्रिल रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. अमानुष छळ केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसात हकीम मुक्तार शेख आणि त्याची आई आबेदा शेख हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास गंगापूर पोलिसांनी सुरू केल्याची माहिती सत्यजित ताईतवाले यांनी दिली आहे.
हेही वाचा :