मुंबई Lok Sabha Elections 2024 : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात 48 जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्यात ज्या संघटना अथवा पक्ष भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक लढवण्यास तयार आहेत, त्यांच्यासोबत जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीसोबत एकत्र जाऊन या निवडणुका लढवाव्यात अशी आमची तयारी होती. मात्र, महाविकास आघाडीकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
केवळ तीन जागांचा प्रस्ताव : महाविकास आघाडीचे नेते जरी वंचितला पाच जागा देणार असं सांगत असले तरी (Lok Sabha Election 2024) प्रत्यक्षात वंचितला तीनच जागा देण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून देण्यात आला होता, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. पाच जागा हे संजय राऊत सांगत आहेत. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. संजय राऊत हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. तसंच, ते एका पक्षाचे नेते आहेत असंही आंबेडकर म्हणाले. तसंच, संजय राऊत यांच्या वक्तव्या संदर्भात प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, संजय राऊत हे महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत यांच्याकडून येणारी वक्तव्यं ही महाविकास आघाडीची वक्तव्यं नाहीत. ते कुणासाठी तरी काम करत असल्याचं दिसतं असा गंभीर आरोपच आंबेडकर यांनी यावेळी केला आहे.
जरांगे पाटील यांच्याशी चर्चा : राज्यात अजूनही आपण समविचारी संघटना आणि पक्षांशी चर्चा करत आहोत. मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांच्याशीही आपली चर्चा झाली आहे. ते येत्या एक ते दोन दिवसांत आपली यादी देणार आहेत. सकल मराठा संघटना या जंरांगे पाटील यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून लवकरच या बाबतीतला निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील अन्य समविचारी संघटना आणि पक्ष यांच्याशीही चर्चा चालू आहे. मात्र, नेमक्या कोणत्या संघटनांसोबत चर्चा आहे हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. एमआयएम पक्षाचे इम्तियाज अली यांनीसुद्धा आपल्याकडे युतीसाठी प्रस्ताव दिला आहे. या संदर्भात विचारले असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे.
केजरीवाल यांची अटक चुकीची : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना करण्यात आलेली अटक ही अत्यंत चुकीची आहे. कारण मद्य धोरणासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयासाठी केवळ केजरीवाल यांना जबाबदार धरता येणार नाही. याच पद्धतीने जर राफेलमध्ये हा न्याय लावायचा म्हटलं तर तत्कालीन पंतप्रधानांना दोषी धरावं लागेल. कारण तेव्हासुद्धा मंत्रिमंडळाचा निर्णय होता. एका घटनेत एक न्याय आणि दुसऱ्या घटनेत दुसरा न्याय असं करता येणार नाही, असंही यावेळी आंबेडकर म्हणाले आहेत.
हेही वाचा :
1 नवनीत राणा यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट - Navneet Rana met Amit Shah