मुंबई– दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील डॉ. ई. मोसेस रोडवर उड्डाणपूल आणि केशवराव खाडे मार्गावर केबल स्टेड फ्लायओव्हर बांधण्याचे काम हाती घेतलंय. या पुलाच्या कामाची पालिकेच्या प्रकल्प विभागाचे सहआयुक्त अभिजित बांगर यांनी पाहणी केलीय. यावेळी 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे पालिकेचे लक्ष्य असल्याचे बांगर यांनी म्हटलंय.
रेल्वे ट्रॅकवर बांधला जाणारा पहिला 'केबल स्टेड ब्रिज' : महालक्ष्मी परिसरातील वाहतूक कोंडी आणि समस्या कमी करण्यासाठी महापालिका दोन पूल बांधत आहे. केशवराव खाडे हा पूल महालक्ष्मी येथील रेल्वे ट्रॅकवर बांधला जाणारा पहिला 'केबल स्टेड ब्रिज' आहे. हा पूल महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील सात रस्ता ते महालक्ष्मी मैदानाला जोडणार आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या पुलाची लांबी 803 मीटर आणि रुंदी 17.2 मीटर आहे. त्याचबरोबर रेल्वे मार्गावरील पुलाची रुंदी 23.01 मीटर आहे. याशिवाय महालक्ष्मी स्थानकाच्या उत्तर बाजू ई. मोसेस रोड ते वरळी मार्गे धोबीघाटापर्यंत बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाची लांबी 639 मीटर आहे.
200 दिवस म्हणजे 7 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता : याबाबत अभिजित बांगर म्हणाले की, केबल-स्टेड पुलाला आधार देण्यासाठी 78 मीटर उंचीचा खांब उभारावा लागणार आहे. त्यातही सुमारे 200 दिवस म्हणजे 7 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तसेच केबल स्टेड पुलाच्या दोन्ही बाजूंचे काम एकाच वेळी करावे लागणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या परवानगीने टप्प्याटप्प्याने रेल्वे परिसरात हे काम केले जाणार असल्याची माहिती बांगर यांनी दिलीय. तसेच पर्यावरण रक्षणासाठी उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे बाधित होणाऱ्या झाडांचे संरक्षण करण्यात आल्याचे महापालिकेने म्हटलंय, त्यासाठी उड्डाणपुलाच्या रचनेत बदल केल्याची माहिती पालिकेने दिलीय.
पुलाचे बांधकाम 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना : केबल पुलाच्या बांधकामासाठी अंदाजे 250 दिवस लागतील. हा कालावधी लक्षात घेऊन पुलाचे बांधकाम 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिकेचे सहआयुक्त आणि प्रकल्प विभागाचे अधिकारी अभिजीत बांगर यांनी दिल्यात, त्यासाठी संपूर्ण नियोजन करण्याची गरज आहे. पुलाच्या कामामुळे काही दुकाने आणि घरे बाधित होणार असून, त्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनादेखील बांगर यांनी दिल्याची माहिती पालिकेने दिलीय. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीसाठी पुरेसा रुंद रस्ता उपलब्ध होणार असल्याचे पालिकेने म्हटलंय.
हेही वाचा :