पुणे : शहरातील स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर बुधवारी लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली. प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी स्वारगेट बस डेपोत कार्यरत असलेल्या सर्व 23 सुरक्षा रक्षकांचं तत्काळ निलंबन केलं. आता नवे सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिरुरमध्ये सर्च ऑपरेशन : घटनेतील आरोपी दत्ता गाडे हा पुणे जिल्ह्यातील शिरुरमधील रहिवासी असून, त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी विविध पथकं रवाना केली आहेत. आरोपी हा शिरुरमधील शेतात लपलेला असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी शेतात सर्च ऑपरेशन सुरू केलंय. ड्रोनच्याद्वारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
आरोपीवर १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्यानं राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा फरार असून, त्याच्यावर 1 लाख रुपयांचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केलं आहे. या घटनेवरून सरकारवर जोरदार टीका होत आहे. हे पोलिसांचं अपयश असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख (सहाय्यक वाहतूक अधीक्षक) आणि आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करावे, असे निर्देश दिलेत.
दत्ता गाडेनं बसमध्ये तरुणीवर दोनदा केला अत्याचार : या प्रकरणी पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आला. लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालं. बुधवारी संध्याकाळी ससून रुग्णालयानं पोलिसांना वैद्यकीय अहवाल दिला. त्या अहवालात आरोपी दत्ता गाडेनं दोनदा तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली.
हेही वाचा -
- आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही, पुणे बलात्कारप्रकरणी अजितदादांचा संताप, तर सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात
- पुणे बस बलात्कार प्रकरण: गृह राज्यमंत्री योगेश कदमांनी केली घटनास्थळाची पाहणी, म्हणाले 'ही तर खासगी सुरक्षा रक्षकांची चूक'
- पुणे अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, आगार व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुखांवर कारवाईचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश